दापोली: उन्हाळी सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसह कोकण व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मात्र चाकरमानी व पर्यटकांच्या मार्गात वाहतूक कोंडीचे विघ्न उभे ठाकले आहे. चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामामुळे मनस्ताप कायम असतानाच इंदापूरपासून माणगावपर्यंतच्या प्रवासात वाहनचालकांची कोंडीच होत आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त होत असून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका त्यांना बसत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या १७ वर्षांपासून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनासह इतर तांत्रिक अडचणींमुळे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. यामुळे सणांच्या कालावधीसह सुट्ट्यांच्या हंगामातही मनस्ताप कायमच राहिला आहे. विशेषतः इंदापूर ते माणगाव-टेमपाले गावापर्यंत सुरू असलेल्या रस्ता कामामुळे वाहतूक कोंडी ऐरणीवर आली आहे. माणगाव शहराच्या बाहेरून नेला जाणारा महामार्ग तांत्रिक अडचणींमुळे धूळखात पडला आहे. याचमुळे माणगाव येथे मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांना तासंतास तिष्ठत थांबावे लागत आहे. इंदापूर ते माणगावपर्यंतच्या प्रवासातील वाहतूक कोंडीचा तिढा कायम असल्याने वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत.

शाळा-महाविद्यालयांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे चाकरमान्यांची पावले गावाकडे वळत आहेत. सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोकणासह गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या बेसुमार संख्येमुळे महामार्ग वाहनांच्या रेलचेलीने गजबजला आहे. मात्र चाकरमानी व पर्यटकांच्या मार्गात वाहतूक कोंडीचा अडसर कायम असल्याने इच्छितस्वळ गाठताना साऱ्यांचीच दमछाक होत आहे. इंदापूर व माणगावदरम्यान दुभाजकच नसल्याने वाहनचालकही बेदकारपणेच वाहने हाकत आहेत. एक रांग न ठेवता ३ रांगा तयार होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे रणरणत्या उन्हामुळे वाहनचालकांना घाम फुटत आहे. त्यात थबकणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची भर पडत असल्याने वाहनचालकांसह प्रवासी घामाघूम होत आहेत. प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने वाहतूक कोंडीचा तिढा जैसे थे आहे. पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचाही फटका बसत आहे. एरव्ही ऐनकैन कारणांनी गरळ ओकणाऱ्या लोकप्रतिनिधींनी वाहतूक कोंडी प्रश्नी मौनच धारण केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.