बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे एका महिलेने ओळखीच्या वृध्दाला स्वत:च्या घरी बोलावून त्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृणपणे खून केला आणि नंतर गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह स्वत: ओढत गावच्या शिवारातील कालव्यात नेऊन टाकला. या घटनेचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही. या कृत्यात संशयित मारेकरी महिलेला अन्य कोणी मदत केली काय, याचाही उलगडा झाला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हणमंतु गणपत देशमुख (वय ६२, रा. धामणगाव) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी एका ४० वर्षांच्या महिलेला वैराग पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात मृत हणमंतु देशमुख यांचे चिरंजीव प्रताप देशमुख (वय ३७) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार हणमंतु देशमुख यांची वृध्दापकाळातही गावातील एका ओळखीच्या महिलेशी सलगी होती. तिच्या घरात त्यांचे अधूनमधून जाणे-येणे होते. नेहमीप्रमाणे त्या महिलेने हणमंतु देशमुख यांना रात्री स्वत:च्या घरात भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून बोलावून घेतले. त्यानुसार देशमुख हे तिच्या घरी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते स्वत:च्या घराकडे परतले नव्हते. मात्र रात्री साडेनऊ ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा या कालावधीत हणमंतु देशमुख यांच्याशी त्या महिलेने भांडण काढून रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला. सपासप वार करून त्यांचा खून केल्यानंतर मृतदेह स्वत:च्या घरापासून ओढत नजीकच्या कालव्याच्या लोखंडी पुलाजवळ आणून टाकला व गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. अनैतिक संबंधाच्या कारणातूनच हा प्रकार घडल्याची शक्यता पोलीस तपास यंत्रणेने वर्तविली आहे. संशयित हल्लेखोर महिलेला अटक करण्यात आली आहे.

करमाळ्यातही खून

करमाळा तालुक्यातील कोळेगाव येथे तेजस प्रकाश सुतार या तरुणाचा लोखंडी टॉमीने मारून खून केला आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देऊन अपघात झाल्याचे भासवत गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीराम भीमराव शेंडगे व दत्तात्रेय केशव रोकडे या दोघांविरूध्द करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दीड वर्षांपूर्वी म्हणजे १३ फेब्रुवारी २०१८ रोजी घडला होता. परंतु मृत तेजस सुतार याच्या खूनप्रकरणी संबंधित हल्लेखोरांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास सुरुवातीला नकार दिला होता. त्यामुळे मृताच्या नातेवाइकांनी न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली असता त्यावर सुनावणी होऊन करमाळा येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी यासंदर्भात संबंधित दोघा संशयितांविरूध्द खून केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old man murdered by woman calling in her own home abn
First published on: 22-09-2019 at 02:14 IST