रत्नागिरी– देश सेवा करणा-या कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिका-यामध्ये सुध्दा एक कलाकार लपलेला असतो. हे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी सिध्द करुन दाखवले आहे. आपल्या कर्मचा-यांचे मनोबल वाढविण्यासाठी चक्क पोलीस अधिक्षक बगाटे यांनी सैराटच्या ‘झिंग झिंग झिंगाट ‘ या गाण्यावर तुफान डान्स केला. या डान्सने बगाटे यांनी उपस्थितांची मने जिंकली.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा प्रशासन, रत्नागिरी जिल्हा पोलीस दल, रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही सायकल रॅली रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस परेड ग्राउंड ते माळ नाका मारुती मंदिर व नंतर भाटये समुद्र किनारा अशी आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी रत्नागिरी जिल्हा नशा मुक्त ठेवायचा आहे, सशक्त भारत घडवण्यासाठी युवकांनी चांगली लाइफस्टाईल निवडावी, असे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले.
या कार्यक्रमावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. महामुनी, पोलीस उपअधिक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, वाहतूक पोलीस निरीक्षक नितीन भोयर, वाद्यवृंद कर्मचारी, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सायकल रॅलीची भाटये किनारी सांगता झाल्यावर आपल्या सहकार्यांसह झिंगाट या गाण्यावर डान्स करून पोलीस अधिक्षक बगाटे यांनी उपस्थिताची मने जिंकली.