पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. देशभरात अनेक ठिकाणी विविध पद्धतीने पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा केला जात आहे. नामीबीया या आफ्रिकन देशातून मोंदींच्या वाढदिवसानिमित्त ८ चित्ते विमानाने भारतात आणले आहेत. संबंधित चित्ते मध्य प्रदेशातील ‘कुनो नॅशनल पार्क’मध्ये सोडण्यात आले आहेत.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील व्यंगचित्रकार आणि शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र कांद्यावर रेखाटून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांचं कांद्यावर चित्र रेखाटून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या कांद्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.

हेही वाचा- ७० खून आणि २५० दरोडे; एकेकाळचे कुख्यात डाकू रमेश सिंग सिकरवार बनले ‘चित्ता मित्र’, आफ्रिकेतून आणलेल्या चित्यांचं करणार रक्षण

सटाणा येथील व्यंगचित्रंकार किरण मोरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, तुषार खैरनार या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विविध पैलू दाखवणारे २१ चित्र रेखाटले आहे. कांद्यावर अशा प्रकारे चित्र रेखाटून त्यांनी पंतप्रधान मोदींना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कांद्यावर रेखाटलेले चित्र, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या कांद्याच्या भावात सुरू असलेल्या घसरणीकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांनी केला आहे. मोदी यांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू दाखवणारे चित्र काढून अगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कांदा भावात होत असलेल्या घसरणीकडे लक्ष वेधले आहे. खरं तर, पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील १५ दिवस ‘सेवा पंधरवाडा’चं आयोजन केलं आहे. दरम्यानच्या पंधरा दिवसांत सामान्य जनतेला सेवा देण्याचा मानस भाजपाचा आहे.