चोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी झाडाला टांगून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर शहराजवळ कुंभारी येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर हा अमानूष प्रकार घडला.

याप्रकरणी गेनसिध्द सिध्दप्पा माळी, आण्णाराव सोमलिंग पाटील, योगेश भीमशा पुजारी आणि बाबुशा सोमलिंग पाटील (रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस हवालदार म्हाळप्पा सुरवसे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार कुंभारी गावच्या शिवारात आण्णाराव सोमलिंग पाटील यांच्या शेतातील वस्तीवर हा प्रकार घडला. पाटील यांच्या शेतात शेळीमेंढी पालन केंद्र आहे. तेथे मध्यरात्रीनंतर ३० ते ३५ वर्षांचा एक अनोळखी तरूण आला. तेव्हा तेथील कुत्रे भुंकू लागल्याने पाटील कुटुंबीय आणि अन्य गावकऱ्यांनी संबंधित तरुणाला पकडले. त्यांनी त्याला चोर समजून झाडाला उलटे टांगून काठय़ांनी बेदम मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने हा तरूण बेशुद्ध पडला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच येथील वळसंग पोलीस ठाण्यातील पोलीस आले. यावेळी हा तरूण बेशुद्ध अवस्थेतच झाडाला लटकलेला आढळून आला. त्याला तातडीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.