पाच बोईंग विमाने, १७ आयफेल टॉवर यांच्या वजनाइतके पोलाद वापरून तसेच ८४ हजार टन वजनाचे ७० ‘स्टील डेक’ बसवून अवघ्या पाच वर्षांत उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब सागरी सेतूचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आधुनिक अभियांत्रिकी जगतातील तंत्रकौशल्याचा देखणा आविष्कार समजला जाणारा हा सागरी सेतू मुंबई आणि नवी मुंबई या शहरांतील प्रवासाचे अंतर कमी करणार असून मुंबईहून पुणे, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वाहनांसाठी वेगवान पर्याय ठरणार आहे. सागरी सेतूसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. नाशिक येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी नाशिकमध्ये भव्य रोडशोही केला. या रोड शोला नाशिककरांनी तुफान प्रतिसाद दिला. त्यानंतर काळाराम मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. गोदावरी तिरावर रामकुंडावर जाऊन जलपूजन केलं. तसंच, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याकरता त्यांनी काळाराम मंदिरात हाती झाडू घाऊन स्वच्छताही केली. तसंच, तिथं त्यांच्यासाठी खास किर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तल्लीन होऊन किर्तनाचा आस्वाद घेतला.
हेही वाचा >> वांद्रे-वरळी सीलिंकचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “पूर्वी हजारो लाखो रुपयांच्या महाघोटाळ्यांची चर्चा असायची, आता…”
नाशिकमधील नियोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईतही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक म्हणजे अटल सेतूचे उद्घाटन. बहुप्रतिक्षित आणि अतिमहत्त्वाकांक्षी असलेल्या या सागरी सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी अटल सेतूवरून प्रवासही केला. अटल सेतूच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विामनतळ येथे अटलसेतू लोकार्पण सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर सभामंडपात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. दुतर्फा असलेल्या लोकांची गर्दी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हात उंचावून अभिवादन केले. त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आराखड्यानुसार हा मार्ग ३.५ किमीचा असणार असणार आहे. अशा या प्रकल्पाच्या कामाचे कंत्राट एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. तर या प्रकल्पाचा खर्च पुन्हा फुगला असून आता तो ९१५८ कोटींवर गेला आहे.
तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर ते पेणधर या पहिल्या मार्गिकेचेही लोकार्पण करण्यात आले. नोव्हेंबर २०२३ मध्येच या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले होते. परंतु, आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवण्यात आला. पेणधर ते बेलापूर या मार्गावर थेट तीन आसनी रिक्षातून आणि इकोव्हॅनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवी मुंबई मेट्रो सर्वात लाभदायी आहे. तळोजा येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. नवी मुंबईतील भविष्याला आकार देणारा हा प्रकल्प ठरणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लाभार्थी कुटुंबियांना प्रातिनिधिक स्वरुपात योजनेतील लाभाच्या पहिल्या हप्त्याचे धनादेश प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आदी उपस्थित होते. या योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये याप्रमाणे १ लाख १ हजार रुपयांची रक्कम देण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेस्ट वन भवनचेही आज लोकार्पण करण्यात आले. ‘आमची मुंबई’ ला ग्लोबल मार्केटचे गोल्डन गेटवे बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. तर भारत रत्नम कॉमन फॅसिलिटी सेंटर (सीएफसी) तयार करण्यात आलं आहे. भारतातील पहिले मेगा सीएफसी असून सीप्झ-विशेष आर्थिक क्षेत्राचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
तर, बहुप्रतिक्षित असलेल्या उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर या रेल्वेगाडीलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे मागील २५ वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेले उरणकारांच्या रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले.
या विविध कामांचं लोकार्पण करताना हे नव्या विकसित भारताची झलक असल्याचं मोदी म्हणाले. यामुळे भारताची प्रतिमा स्वच्छ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.