सोलापूर : कांद्याची दररोज होणारी उच्चांकी आवक, परिणामी कांदा लिलाव एक दिवसाआड बंद ठेवाण्याचा निर्णय, परिणामी दुसऱ्या दिवशी होणारी कांद्याची वाढीव आवक आणि त्यामुळे सुरू असलेली दर घसरणीची मालिका, त्यात कांदा उतरवून घेण्यासाठी माथाडी कामगारांनी वाढवून घेतलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली अडचण दूर करण्यात सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीला मर्यादा पडल्याचे दिसून येते. नियोजन कोसळल्यामुळे कृषी बाजार समितीच्या विरोधात शेतकऱ्यांची नाराजी वाढली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. कांदा उतरवून घेण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्यामुळे तसेच कांदा दरातही घसरण होत असल्यामुळे कृषी बाजार समिती प्रशासनाने कांद्याचा लिलाव दररोज नव्हे तर एक दिवसाआड करण्याचे धोरण पत्करले होते. परंतु लिलावाच्या दिवशी कांदा आवक दुप्पट होत असल्यामुळे अडचण वाढली आहे. यात नियोजनाचा अभाव असताना दुसरीकडे कांदा दर कोसळल्यामुळे शेतकरीवर्गात निराशा आणि संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा – सांगली : विचित्र हवामानामुळे द्राक्षावर करपा

दरम्यान, कांदा आवक, लिलाव आणि दर घसरणीमुळे कृषी बाजार समितीतील वातावरण चिघळत असताना त्यात वेळीच हस्तक्षेप करण्यासाठी बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक पुढे येत नव्हते. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सभापती तथा भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी बाजार समिती कार्यालयात पाऊल ठेवले आणि शेतकरी, व्यापारी व प्रशासनाची बैठक घेतली. यात कांदा लिलाव दररोज करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी शेतकऱ्यांनी दररोज रात्री दहानंतरच कांदा आणावा. त्या अगोदर आलेला कांदा कृषी बाजारात स्वीकारला जाणार नाही. दररोज कांदा वाहतुकीच्या पाचशे ते सहाशे गाड्यांनाच बाजार समितीत प्रवेश दिला जाईल. उर्वरीत कांदा वाहतुकीच्या गाड्या शेतकऱ्यांनी आपापल्या जबाबदारीवर आणताना कृषी बाजार समितीच्या बाहेर रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यास बाजार समिती जबाबदार राहणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार समितीबाहेरील जनावरांचा आणि चारा बाजारातील मोकळ्या मैदानावर कांदा वाहतुकीच्या गाड्या थांबवाव्यात, असेही सुचविण्यात आले आहे.

हेही वाचा – सांगली : जतच्या पूर्व भागात कृष्णेचे पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तथापि, शेतकऱ्यांचा कांदा दाखल होत असताना रात्री दहानंतरच बाजार समितीत प्रवेश दिला जात असल्यामुळे वाहन वाहतुकीचा वाढीव भुर्दंड शेतकऱ्यांनाच सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे कांदा दरात घसरण सुरूच आहे. सोमवारी ८८ हजार ८१३ क्विंटल कांदा दाखल झाला असता दर मात्र एक हजार ते १४०० रुपयांपर्यंतच मिळाला. गेल्या पंधरा दिवसांत निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणावर दर कोसळले आहेत.