इंटरनेटच्या माध्यमातून ‘महावितरण’ने सुरू केलेल्या ऑनलाइन वीजबिल भरण्याच्या सुविधेला पुणे विभागात चांगला प्रतिसाद मिळत असून, महिन्याभरात दोन लाख १२ हजार ग्राहकांनी या सुविधेतून तब्बल २६ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे.
ऑनलाइन वीजबिल भरणा सुविधेच्या माध्यमातून सहा महिन्यांपूर्वी ‘महावितरण’च्या पुणे परिमंडलातील दीड लाख वीजग्राहकांकडून सुमारे १५ ते १६ कोटी रुपयांच्या बिलाचा भरणा होत होता. त्यात प्रत्येक महिन्यामध्ये वाढ होताना दिसते आहे. ऑक्टोबर महिन्यात दोन लाख १२ हजार ग्राहकांनी २५ कोटी ९५ लाख रुपयांचा भरणा केला.
गणेशखिंड मंडलमधील ऑनलाइन भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या एक लाख दहा हजारांवर गेली आहे. या विभागात ऑनलाइन सुविधेतून १३ कोटी ५१ लाख रुपयांचा भरणा होत आहे. रास्ता पेठ मंडलात ९३ हजार ग्राहक १० कोटी ८५ लाखांचा ऑनलाइन भरणा करीत आहेत.
पुणे ग्रामीण मंडलामध्ये नऊ हजार ग्राहक दरमहा एक कोटी ६० लाख रुपयांचा भरणा ऑनलाइनच्या माध्यमातून करतात.
‘महावितरण’ने http://www.mahadiscom.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन वीजबिल भरणा करण्याची सुविधा दिली आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना क्रेडीट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून किंवा नेटबँकिंगद्वारे वीजबिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेत वीजबिलाच्या रकमेशिवाय कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. ‘महावितरण’च्या संकेतस्थळावरील ‘कन्झुमर सव्‍‌र्हीस’ या विभागात याबाबतची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.