India Pakistan War Tensions : २२ एप्रिलच्या दिवशी काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना प्राण गमावावे लागले. त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोळ्या आणि अश्रू या सगळ्यांनी काश्मीरचं वातावरण एकदम दुःखदायक झालं. या सगळ्या घटनेचे पडसाद जगभरात उमटले. जगभरातून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं समजलं. दरम्यान ६ मे च्या रात्री उशिरा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन भारताने उत्तर दिलं. मात्र राज ठाकरे यांनी याबाबत नकारात्मक म्हणता येईल अशी प्रतिक्रिया दिली. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

“पहलगामला जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी जे पहिले ट्विट केले त्यामध्ये सांगितले होते की, ज्यांनी हल्ला केला त्या दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला पाहिजे जो त्यांच्या पुढील पिढ्यांनाही लक्षात राहिल. पण, दहशतवादी हल्ल्याला उत्तर उद्ध नसतं. दहशतवाद्यांनी अमेरिकेत ट्वीन टॉवर्स पाडले म्हणून त्यांनी युद्ध नाही केले. त्यांनी दहशतवादी ठार मारले.” राज ठाकरे पुढे म्हणाले, “मुळात ही गोष्ट का घडली हे लक्षात घेण्यासारखे आहे. आपण थोडासा आपला विचार करणेही गरजेचे आहे. पाकिस्तानला काय बरबाद करणार आहे, तो आधीच बरबाद झालेला देश आहे. ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केले ते अजून सापडलेले नाहीत, ज्या पर्यटन स्थळावर हल्ला झाला तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती? हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत.” असं राज ठाकरे म्हणाले. या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनीही उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंबाबत काय म्हणाले?

“राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठिशी उभा आहे. संपूर्ण कारवाईचं स्वागत करतो आहे. संपूर्ण जग भारताची वाहवा करते आहे आणि भारताच्या पाठिशी जग उभं आहे.” असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रींनी काय सांगितलं?

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओजेकेमधील जैश-ए-मोहम्मदसह अनेक दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, “पहलगाममधील हल्ला अत्यंत क्रूर होता, ज्यामध्ये मृतांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या घालून त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांची हत्या करण्यात आली. हा हल्ला स्पष्टपणे काश्मीरमधील सामान्य परिस्थिती बिघडवण्याच्या उद्देशाने होता.”