मान्सून बरसण्यात अद्याप दीड महिन्याचा कालावधी असला, तरी प्रशासनाने आत्तापासूनच उपययोजनांना हात घालण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा दक्ष ठेवली जाणार आहे. याबाबतची नियोजनाची पहिली बैठक ६ मे रोजी होणार असून त्यामध्ये उपाययोजनांबाबत निर्णय घेतले जाणार आहेत.    
चैत्र महिन्यातील कडक उन्हाने लोक बेजार झाले होते. उन्हाची तीव्रता वाढत चालली असून वळिवाचे आगमनही झाले आहे. दोनतीन वेळा जोरदार सरी कोसळल्याने शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने पावसाळ्याचा सामना करण्यासाठी प्राथमिक तयारी सुरू केली आहे. आपत्ती निवारण कक्ष कार्यरत असला, तरी या कक्षाला अधिकृत रीत्या प्रमुख व्यक्ती नसल्याने सर्व विभागाच्या मदतीने कक्षाचे काम चालविले जाणार आहे. पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून व इतर वस्तूंची सज्जता ठेवली जाणार आहे.     
जिल्हा प्रशासनाबरोबर महापालिका, जिल्हा परिषद, महावितरण यांनीही आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. महापालिकेने शहरातील नाले व चॅनेल्सची सफाई मोहीम हाती घेतली आहे. ३१९ नाले व चॅनेल्स शहरात असून त्यातील निम्म्याहून अधिक नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. वळिवाचा पाऊस झाल्याने नाल्यांची दुसऱ्यांदा स्वच्छता करावी लागण्याची चिन्हे आहेत. मोठय़ा नाल्यांच्या पात्रामध्ये पाण्यासोबत येणारा कचरा व गाळ साचत असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. त्यासाठी जेसीबी मशिनच्या साहाय्याने अशा प्रकारचा गाळ काढला जात आहे. जयंती नाल्यातील गाळ काढण्याचे काम गतीने सुरू असले तरी ते पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी जावा लागणार आहे. पावसाचे पाणी कोठेही अडून न राहता ते प्रवाहित राहिले पाहिजे, असा महापालिका प्रशासनाचा हेतू आहे.     
जिल्हा परिषदेने गतवर्षी १७ मे पासून या अशा प्रकारच्या नियोजनाला सुरुवात केली होती. यंदा हे काम तीन आठवडे अगोदरच सुरू झाले असून प्रत्येक गावांमध्ये आरोग्य विषयक सुविधांच्या उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि एकत्र रीत्या हे काम सुरू केले आहे. गावांमध्ये दोन महिने पुरेल इतका टिसीएलचा पुरवठा करणे, पाणी शुद्धीकरणासाठी मेडिक्लोर खरेदी करून प्रत्येक कुटुंबाला वाटप करणे, नळ गळतीची दुरुस्ती करणे, कावीळसारखे आजार विषाणूजन्य असल्याने पाणी उकळून थंड करून पिण्याबाबत प्रबोधन करणे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे नमुने नियमितपणे तपासणीस पाठविणे आदी प्रकारची दक्षता घेतली जाणार असून त्याचे नियोजन सुरू झाले आहे. तर महावितरणच्या वतीने ज्या झाडांच्या फांद्या विद्युत तारांना स्पर्श करीत आहेत, त्याची तोड केली जात आहे. याशिवाय नादुरुस्त विद्युत जनित्रे बदलणे, भूमिगत वायरिंगची तपासणी करणे, उघडय़ा डीपी बंदिस्त करून घेणे आदी प्रकारची कामे केली आज आहेत.