कराड : मेक इन इंडियाच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत देश आज गतीने पुढे जातोय, त्याची आर्थिक अन् लष्करी सामर्थ्य ही खरी ओळख असल्याने जगात भारताला कोणीही कमी लेखू शकत नाही. भविष्यातील भारत शिक्षण, ज्ञान, तंत्रज्ञान अन् ग्रामविकासाच्या बळावर सक्षम असेल असा ठाम विश्वास भारत फोर्जचे अध्यक्ष, ख्यातकीर्त उद्योगपती डॉ. बाबा कल्याणी यांनी व्यक्त केला.
येथील पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ डॉ. बाबा कल्याणी यांना माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे होते.
डॉ. बाबा कल्याणी म्हणाले, आपले राष्ट्र पुढे न्यायचे असेल, तर उद्योगासोबत शिक्षण, ज्ञान अन् तंत्रज्ञानाची सांगड आवश्यक असून, केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तयार तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता, ते निर्माण करण्याची क्षमता आपल्या तरुणाईत हवी. उद्योग, व्यवसाय केवळ नफा कमावण्याची साधने नसावीत. तर, ते गाव, समाज, राष्ट्राच्या विकासाला बळ देणारे असले पाहिजे. सर्वांनी हा विचार केल्यास भारत झपाट्याने पुढे जाईल, असाही विश्वास डॉ. कल्याणी यांनी व्यक्त केला.
भारत फोर्जच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) सातारा जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये शिक्षण, स्वच्छता, रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधांची उभारणी केली. लोकसहभागातून घरगुती उत्पन्न पटीने वाढवण्याचे ध्येय आहे. त्यातून गावाबाहेरील लोक गावाकडे वळत असल्याचीच खरी उपलब्धी असल्याचे कल्याणी यांनी सांगितले.
कराडचे नगराध्यक्षपद ४३ वर्षे भूषवणारे (कै.) पी. डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांच्या नावाने मिळालेला हा आपल्या मातीतील पुरस्कार आनंददायी असल्याचे डॉ. कल्याणी यांनी सांगितले.
उल्हास पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाणांच्या प्रभावळीत पी. डी. पाटील होते. त्यांनी कराडचा सर्वांगीण विकास साधला. सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून किर्लोस्कर, ओगले, कल्याणी हे उद्योजक होते. आज बाबा कल्याणी उद्योगक्षेत्रात अग्रणी असल्याचे कौतुक करत, त्यांच्या कार्याची यशस्वी पताका जगभरात उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब पाटील म्हणाले, कराड, साताऱ्याच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांच्यासह उद्योजक निळकंठराव कल्याणी यांनीही योगदान दिले. देश व जागतिक पातळीवर मोठे नाव कमावले.