मराठवाडय़ातील अटीतटीच्या लढतींमध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार ठरली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील व शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांच्यातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.
चाळीस वर्षांपूर्वी, १९७४मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना महायुतीचे प्रा. गायकवाड यांनी कोंडीत पकडले आहे. त्यातच भाजपतून बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी करणाऱ्या रोहन देशमुख यांच्यामुळे चुरस वाढविली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात तेरणा साखर कारखान्याची सूत्रे ज्याच्या हाती, त्याच्याकडे आपसूकच जिल्ह्याच्या सत्तेची सूत्रे येत. १९७९मध्ये पहिल्यांदा तेरणा कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव नाडे, तुळशीराम पाटील व समुद्रे यांच्या तावडीतून कारखाना डॉ. पाटील यांनी आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून त्यांचा राजकीय अश्वमेध दौडत राहिला. विविध खात्यांचे मंत्रिपद, विधानसभा उपसभापती, सभागृहातील पक्षाचे उपनेते अशा पदांवर काम करणाऱ्या पाटील यांच्या तावडीतून कारखाना गेला आणि राजकीय पिछाडी सुरू झाली. सध्या कारखाना शिवसेनेचे आमदार ओम राजेिनबाळकर यांच्या ताब्यात आहे. महायुतीच्या प्रचाराची सर्व धुरा त्यांनी यंदा आपल्या खांद्यावर घेतली होती.
राज्यातील एका बलाढय़ नेत्यासमोर शिवसेनेचे प्रा. गायकवाड यांनी दुसऱ्यांदा शड्ड ठोकला आहे. मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यास शिवसेना एकवटली आहे, तर अपक्ष रोहन देशमुख यांच्यामुळे होणाऱ्या मतविभागणीचा लाभ राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना व महायुती अशी दुरंगी लढत असली, तरी देशमुख यांच्यासह २३ उमेदवारांमध्ये मतांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे चुरस लक्षवेधी ठरली आहे.