सातारा : रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा साताराभूषण पुरस्कार पद्मभूषण ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या रासायनिक, अभियांत्रिकी आणि अणुविज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन २०२५ च्या साताराभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती ट्रस्टच्या विश्वस्त परिवाराने दिली आहे.
जोशी यांची निवड स्वर्गीय अरुणराव गोडबोले यांनीच केली असल्याची माहिती या ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अच्युत गोडबोले यांनी दिली. विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. रोख ४० हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ज्येष्ठराज जोशी साताऱ्यातील मसूर (ता. कराड) येथील आहेत. त्यांनी मुंबईतील डॉ. होमी भाभा इन्स्टिट्यूट तसेच परदेशातील अनेक विद्यापीठांत अध्यापनाचे काम केले आहे. ५४ वर्षे संशोधन व अध्यापनाचे काम करणारे जोशी यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविलेले आहे.
याबरोबरच त्यांना भटनागर पुरस्कार, उत्तम शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांचे एक हजाराहून अधिक संशोधनावरील विशेष लेखही प्रकाशित करण्यात आले आहेत. नवीन प्रकारच्या केमिकल व औद्योगिक इंजीनियरिंगमधील संशोधन त्यांनी केले. संशोधन व अध्यापनाचे काम खरोखरच गौरवपूर्ण असे आहे. जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेसाठी विशेष योगदान दिले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी त्यांनी केलेले कार्य हे गौरवपूर्ण असे आहे. त्यांना आतापर्यंत दोनशेहून अधिक पुरस्कार व त्यांच्या शोधनिबंधांवर अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी घेतली आहे.
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून मूळ सातारकर असलेल्या जोशी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ नीळकंठराव कल्याणी, राजमाता सुमित्राराजे भोसले, शाहीर साबळे, कै. डॉ. नरेंद्र दाभोलकर, ह.भ.प. बाबामहाराज सातारकर, गिरीश कुबेर, बी. जी. शिर्के, रयत शिक्षण संस्था, सविता प्रभुणे, ललिता बाबर, चित्तरंजन कोल्हटकर, यमुनाबाई वाईकर, सयाजी शिंदे, चेतना सिन्हा, फरोख कूपर आदी अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरविले आहे. जोशी यांची निवड स्वर्गीय अरुणराव गोडबोले यांनीच केली असल्याची माहिती या ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अच्युत गोडबोले यांनी दिली. त्यांच्या रासायनिक, अभियांत्रिकी आणि अणुविज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन २०२५ च्या साताराभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती ट्रस्टच्या विश्वस्त परिवाराने दिली आहे. लवकरच विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. रोख ४० हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
