लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : पालघर व बोईसर या महत्त्वाच्या शहरांमध्ये नागरिकांना संपर्क साधणे सोयीस्कर व्हावे म्हणून येथे राज्य परिवहन मंडळतर्फे  रिंगरूट सेवा येत्या ८ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. सेवेमुळे  रिक्षाचालकांकडून आकारल्या जाणाऱ्या अवास्तव भाडय़ावर चाप बसणार आहे.

या सेवेत बोईसरहून पालघरकडे येणारी बस डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून माहीम मार्गे येणार आहे. पालघरहून बोईसरकडे परतीच्या प्रवासाची बस मनोर मार्गे बोईसर येथे पोहोचणार आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू होणारी ही सेवा रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत सुरू राहणार असून दर १५-२० मिनिटांनी दोन्ही बस आगारामधून सेवा सुरू हणार आहे.

पालघरहून बोईसरकडे जाताना १३.१० किलोमीटर अंतरासाठी पंधरा रुपये भाडे आकारले जाणार आहे.  पालघर रेल्वे स्थानकापासून सरावलीपर्यंत दहा रुपयात प्रवास करता येणार आहे. बोईसर येथून आंबेडकर चौक मार्गे बस पालघरकडे येताना कोळगावपर्यंत दहा रुपये तर हुतात्मा स्तंभापूर्वी सद्गुरू उपाहारगृहापर्यंत पंधरा रुपये भाडय़ात प्रवास करता येणार आहे.  याच मार्गावर सध्या सहा आसनी रिक्षाचालकांकडून शेअर पद्धतीने २० ते ३० रुपये भाडे आकारले जाते.  आता राज्य परिवहन मंडळाच्या या सेवेमुळे रिक्षाचालकांची मुजोरी संपुष्टात येईल अशी शक्यता आहे.

पालघर-बोईसर मार्गावर कोळगावजवळ नवीन जिल्हाधिकारी कार्यालय संकुल मार्च-एप्रिल महिन्यात सुरू होणे अपेक्षित आहे. दोन्ही रेल्वे स्थानकांवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणे सहज व किफायतशीर दरामध्ये शक्य  होणार  आहे. पालघर तालुका हा मुंबई मेट्रोपोलिटन अर्थात (एमएमआर) क्षेत्राअंतर्गत येत असल्याने या भागात दोन्ही बाजूने खुल्या दरवाजाची डबल डोअर बससेवा सुरू करण्याचे देखील राज्य परिवहन मंडळाच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar boisar ring root bus service from 8 march dd
First published on: 03-03-2021 at 01:04 IST