|| नीरज राऊत
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५६ उमेदवार, पंचायत समितीसाठी १११ उमेदवार रिंगणात; अधिकतर जागांवर आरक्षित उमेदवार
पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होणार असून पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १७ गटांसाठी ५६ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. पंचायत समितीच्या ३३ जागांसाठी १११ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीची सरावली गणाची जागा बिनविरोध झाली. तालुक्यातील अधिकतर जागांवर आरक्षित उमेदवार निवडणूक लढवत असल्याने मर्यादित स्वरूपात रंगत येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या पालघर तालुक्यातील १७ जागांपैकी एक जागा अनुसूचित जाती, १३ जागा अनुसूचित जमाती तर दोन जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून त्यापैकी बोईसर (वंजारवाडा), सरावली, सावरे- ऐबूर व शिरगाव या चार ठिकाणी आमनेसामने लढती होणार असून दांडी, पास्थळ, खैरापाडा, नंडोरे, देवखोप, सातपाटी, केळवा, एडवण व सफाळे या ठिकाणी तिरंगी लढती होणार आहेत. तालुक्यातील तारापूर, शिगांव- खुताड व मनोर येथे चौरंगी लढत होणार असून बोईसर काटकरपाडा व बऱ्हाणपूर येथे सहा उमेदवार रिंगणात आहेत.
पंचायत समितीच्या ३४ जागांपैकी १४ जागा सर्वसाधारण असून आठ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, ११ जागाा अनुसूचित जमाती तर एक जागा अनुसूचित जातीकरिता राखीव आहे. पंचायत समितीची सरावलीची जागा शिवसेनेने बिनविरोध पटकावली असून सालवड, दांडीपाडा, मान, बऱ्हाणपूर, शिरगाव व मायखोप येथे सरळ लढती होणार आहेत. खैरापाडा, कोंढाण या गणांमध्ये पाच उमेदवार रिंगणात असून दांडी गणांमध्ये तब्बल ११ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील उर्वरित गणांमध्ये तिरंगी व चौरंगी लढत होत असल्याचे दिसून आले आहे.
तालुक्यातील १७ जिल्हा परिषद जागांसाठी शिवसेनेने सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून भाजपने १२, बहुजन विकास आघाडीने नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसने चार, काँग्रेस पक्षातर्फे तीन, मनसे व कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रत्येकी एक तर नऊ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या ३३ जागांसाठी शिवसेनेचे ३० उमेदवार निवडणूक लढवत असून भाजपचे २३, बहुजन विकास आघाडीचे १८, राष्ट्रवादी काँग्रेस नऊ, मनसेतर्फे चार, काँग्रेसचे तीन तसेच १७ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अपेक्षित रंगत नाही
तालुक्यात पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी अधिक प्रमाणात जागा असल्याने जिल्हा परिषदेपेक्षा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अधिक चुरस आहे. अनुसूचित जमातीचे उमेदवार मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना अडचणी निर्माण झाल्याने अनेक जागांकरिता गट आणि गणाबाहेरील उमेदवारांना उमेदवारी दिली गेल्याने ‘स्थानिक’ हा निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा बनला आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांकरिता पैसा कोणी खर्च करावा, हा प्रश्न असल्याने या निवडणुकीत एकंदर रंगत मर्यादित स्वरूपातच राहिली आहे. पालघर तालुक्यात झपाटय़ाने विकास होत असल्याने नागरिकांच्या मूलभूत व पायाभूत सुविधांचा स्तर उंचावणे तसेच पूर्वीच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा आढावा घेण्याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे प्रचारादरम्यान दिसून येते. दांडी या सर्वसाधारण जागेसाठी तब्बल ११ उमेदवार रिंगणात असून इतर ठिकाणी अधिकतर तिरंगी आणि चौरंगी लढती होणार आहेत.
अंतर्गत समझोता
पालघर जिल्ह्य़ात महाविकास आघाडी तसेच महाआघाडीची स्थापना करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र काँग्रेस पक्षाला पुरेशा प्रमाणात व अपेक्षित ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी न मिळाल्याने या आघाडीमध्ये काँग्रेस सहभागी झाली नाही. अनेक ठिकाणी बहुजन विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी परस्परांकरिता माघार घेतली असली तरीही नवापूर, टेण, मनोर, सावरे- ऐंबूर या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. बोईसर व सरावली भागात शिवसेना, बविआ यांच्यात समझोता होऊन भाजपला विजयापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहे.
जिल्हा परिषद गट
- दोन उमेदवार- बोईसर (वंजारवाडा), सरावली, सावरे-ऐंबूर, माहीम
- तीन उमेदवार- दांडी, पास्थळ, खैरापाडा, नंडोरे-देवखोप, सातपाटी, केळवा, एडवण, सफाळे
- चार उमेदवार- तारापूर, शिगांव-खुताड, मनोर
- सहा उमेदवार- बोईसर, बऱ्हाणपूर
पंचायत समिती गण
- दोन उमेदवार- सालवड, दांडीपाडा (बोईसर), मान, बऱ्हाणपूर, शिरगाव, मायखोप
- तीन उमेदवार- तारापूर, कुरगाव, पास्थळ, काटकरपाडा (बोईसर), बोईसर, बोईसर (वंजारवाडा), सरावली (अवधनगर), उमरोळी, शिगांव- खुताड, दहिसरतर्फे मनोर, धुकटण, सातपाटी, माहीम, केळवा, एडवण, विराथन बुद्रूक, सफाळे, नवघर घाटीम
- चार उमेदवार- नवापूर, टेण, मनोर, सावरे-ऐंबूर, नंडोर-देवखोप, मुरबे
- पाच उमेदवार- खैरापाडा, कोंढाण
- अकरा उमेदवार- दांडी