पालघर : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी औद्योगिक, व्यापारी संस्था राहणार बंद

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर ३ जून रोजी धडकण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर ३ जून रोजी धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज होत असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे. ३ जून रोजी संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे याकरिता औद्योगिक व व्यापारी अस्थापने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येणार आहेत.

‘निसर्ग’ चक्रीवादळ राज्याच्या श्रीवर्धन ते दमण दरम्यानच्या किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता पाहता त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तसेच महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पोलीस अधिकारी यांच्याशी तसेच वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आज तयारीच्या दृष्टीने चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढील दोन दिवस आपल्या कामाच्या ठिकाणीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

३ जून रोजी सर्व दुकाने व व्यापारी आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असून त्याच पद्धतीने जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील सर्व उद्योगांनी आपल्या आस्थापने बंद करण्यासाठी आदेश निर्गमित करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. कच्च्या घरात, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे माहिती संकलित करण्यात येत असून तेथील नागरिकांसह वयोवृद्ध नागरिक, गर्भवती महिला यांचे निर्वासन (evacuation) सुरक्षित ठिकाणी करण्याचे काम उद्या २ जून पासून हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्याने १ जून पासून मासेमारी बंदीचा आदेश काढला असला तरीसुद्धा सद्यस्थितीत जिल्ह्यातील १०० बोटी सध्या समुद्रात अडकल्या आहेत. या बोटींना किनाऱ्यापर्यंत सुरक्षितपणे आणण्यासाठी तटरक्षक दलाची मदत घेतली जात आहे. पुढील चार दिवसांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या लहान-मोठ्या बोटी समुद्रात जाऊ नये यासाठी तटरक्षक दल व सागरी पोलिसांमार्फत दक्षता घेण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व किनारपट्टीवर नागरिकांसाठी प्रवेशबंदी करण्याचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

किनारपट्टीच्या भागांतील नागरिकांचे स्थलांतर केले जात असताना संबंधित नागरिकांनी आपली औषधे, मास्क, हात धुण्याचे साबण, खाद्यपदार्थ सोबत द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर नागरिकांनी पुरवठा खंडित झाल्यास मेणबत्या, ड्राय बॅटरी चार्जर तसेच दूध व इतर खाद्यपदार्थांचा मुबलक साठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाच्या कार्यकाळात मुसळधार पाऊस झाल्यास उद्भवणार्‍या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची तयारी सुरू करण्यात आली असून पालघर व डहाणू येथे एनडीआरएफ प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात येणार आली आहे. तटरक्षक दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा समन्वय साधून आवश्यक ती उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Palghar industrial and commercial establishments will be closed due to cyclone on 3 june aau