पंढरपूर : गेले अनेक वर्षे प्रदूषित पाण्यामुळे वारकऱ्यांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत संतापाचा विषय झालेला चंद्रभागा प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागण्याचे चिन्हे आहेत. नदी प्रदूषणाला आवर घालण्यासाठी ‘नमामि चंद्रभागा’ नदी कृती आराखड्याला बुधवारी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या अंतर्गत प्रदूषित नियंत्रित घटकांवर कारवाई केली जाणार आहे. तीन वर्षांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत होत आहे.
भीमा नदीचे पाणी पिंपरी चिंचवड, पुणे, उजनी धरण येथून पुढे पंढरपूरला मिळते. मात्र, या नदीपात्रात अनेक उद्योगांसह साखर कारखान्यांचे दूषित पाणी मिसळते. विविध गावांचे सांडपाणीही नदीत थेट सोडले जाते. या मुळे गेल्या काही वर्षांत चंद्रभागा नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेस आला होता. वारकऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. पंढरपूर येथे प्रमुख चार यात्रा, दरमहा एकादशी तसेच सुट्टीच्या कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी येतात. इथे आल्यावर वारकरी संप्रदायात चंद्रभागा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नमामि गंगेच्या धर्तीवर नमामी चंद्रभागा योजना आखली होती. २०१६ साली या योजनेला तत्कालीन महायुतीच्या सरकारने मंजुरी दिली होती. मात्र, पुढे ही योजना कागदावरच राहिली. आता या योजनेला पुन्हा कार्यन्वित करून कालबद्ध पद्धतीने चंद्रभागा नदी प्रदूषण मुक्त केली जाणार आहे. पुढील ३ वर्षांत चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा शासनाच्या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.