पंढरपूर : वारकरी संप्रदायातील महत्त्वाची कार्तिकी यात्रा. या यात्रा कालावधीत पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अधिकच्या सुविधांबाबत नियोजन करण्यात आले आहे. मंदिरात सुरू असलेले संवर्धनाचे काम जलदगतीने आणि गुणवत्तापूर्ण करावे. तसेच राज्यातील संतांची परंपरा जगभरात व्हावी याकामी संतवाणी रेडीओ व ॲपद्वारे माहिती पोहोचवता येईल, याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना देणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. दरम्यान, कार्तिकी एकादशी १२ नोव्हेंबर रोजी आहे.

येथील भक्त निवास येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सभा सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, संभाजी शिंदे, ह. भ. प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ह. भ. प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, वास्तुविशारद, तसेच सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा : Raj Thackeray : मनसेला विधानसभेसाठी महायुतीची साद? शिंदेंच्या शिवसेनेचे नेते म्हणाले, “राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात”

कार्तिकी एकादशी दि.१२ नोव्हेंबर रोजी होत आहे. या दिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व मानाचे वारकरी यांचे शुभहस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा केली जाणार आहे. या यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरा तसेच भाविकांना देण्यात येणाऱ्या सोई सुविधांचा आढावा घेण्यात आला. मागील वर्षीप्रमाणे पत्राशेड येथे पूर्णवेळ अन्नछत्र सुरू करणे तसेच यात्रेच्या अनुषंगाने विविध सोयीसुविधांचा आढावा घेऊन भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे बैठकीत ठरले.

धर्मादाय आयुक्त यांनी नुकतीच अनुकंपा तत्त्वावरील नियमावलीस मंजुरी दिली आहे, या नियमावलीनुसार आस्थापनेवरील अकस्मात मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच धर्मादाय आयुक्त यांच्या मान्यतेनुसार आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात आले. तसेच विठ्ठल रूक्मिणी भक्त निवास, वेदांता भक्तनिवास व व्हिडिओकॉन भक्तनिवासाच्या ठिकाणी सोलर प्लांट बसविणे आदी विषयांवर चर्चा झाली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारीत करणे इत्यादी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

हेही वाचा : Malad Mob Lynching : मालाडमध्ये जमावाच्या मारहाणीत मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू; व्हायरल व्हिडिओची पक्षाने घेतली दखल, नेते म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतवाणी रेडिओ

महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी म्हणजेच पंढरपूर (श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर), आळंदी (श्री संत ज्ञानदेव), त्र्यंबकेश्वर (श्री संत निवृत्तीनाथ), सासवड (श्री संत सोपानदेव), मुक्ताईनगर (श्री संत मुक्ताबाई), पैठण (श्री संत एकनाथ) व देहू (श्री संत तुकाराम) येथे ‘कम्युनिटी रेडिओ ’ प्रवर्तित करण्याचा मंदिर समितीचा मानस आहे. या सर्वांचे पालकत्व व नेतृत्व करण्यास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती तयार आहे. संतवाणी रेडिओ व ॲपद्वारे जगभरात संतवाङ्मय पोहोचविता येईल. हा विषय तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट करणेकामी जिल्हाधिकारी, सोलापूर यांना प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सहअध्यक्ष औसेकर यांनी दिली.