पंढरपूर : संजय राऊत रोज उठून काहीतरी आरोप करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सरकार चालवायचे का? असा सवाल उपस्थित करत मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. राऊत हे राज्यातील मंत्रिमंडळ हटवायला बसले आहेत. त्यांना वाटतं आमचं मंत्रिमंडळ जाऊन त्यांचे येईल, पण ते स्वप्नात असल्याची टीका महाजन यांनी केली. दरम्यान एकनाथ खडसे सध्या राजकारणाबाहेर असल्यामुळे अस्वस्थ असून त्यातूनच ते रोज नवे आरोप करत असल्याची टीकाही त्यांनी केली तसेच मंत्रिमंडळ बदलात सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळाली तर आनंदच होईल, असेही महाजन या वेळी म्हणाले.
महाजन हे जामनेर या त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या दिंडी समवेत पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की संजय राऊत रोज उठून काहीतरी आरोप करतात. त्यांच्या आरोपानंतर त्यांना वाटते, की यामुळे सत्तेत बदल होईल. परंतु या अशा बडबडीमुळे सत्तेत बदल होत नसतो. त्याकडे आता सगळेच जण दुर्लक्ष करू लागले आहेत.
‘हनी ट्रॅप’ चा विषय हा माझ्यासाठी संपला असल्याचे सांगत महाजन म्हणाले, की उगाचच वाढवलेल्या या विषयावर मला जे सांगायचे आहे, ते सांगितले आहे. माझ्यासाठी आता हा विषय संपला आहे. खडसे अस्वस्थ आहेत. त्यातूनच ते रोज आरोप करत असतात. राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि संजय शिरसाठ यांच्यामध्ये काही वाद असतील. काही मतभेद असतील तर मुख्यमंत्री यावरून निश्चित तोडगा काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरद पवार, उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करतात याचा संदर्भ देत महाजन म्हणाले, की राजकारण आणि एकमेकांशी असलेले संबंध हे स्वतंत्रपणे जपता आले पाहिजेत. राजकारणात फक्त उणीधुणी काढायची नसतात. पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंशी आपण स्वतः बोललो. त्यांनी दिलखुलास मुलाखतही दिली. फडणवीस यांचे कौतुकही केले.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे कायम पक्ष, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित असतात. ते भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे मोहिते पाटील अजूनही भाजपमध्येच असल्याचे महाजन यांनी सांगितले. आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीसह उबाठातील अनेक नेते आमच्या पक्षात येणार असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.