पंढरपूर : आषाढी यात्रेला प्रमुख संतांसह अन्य संतांच्या पालख्या पंढरीला येतात. या सर्व वारकरी, भाविकांना पालखी मार्ग, विसावा, तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, तसेच पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. दरम्यान, आषाढी शुद्ध एकादशी सोहळा ६ जुलै रोजी असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३० जून, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे १ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.

आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आदी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच पालखी मार्गावरून पालखीतळांकडे जाणाऱ्या रस्त्याची वारी पूर्वी दुरुस्ती करावी. भंडीशेगांव येथील जलसंपदा विभागाच्या जागेत मोडकळीस आलेल्या इमारती असून, त्या इमारती पाडण्यासाठी पाटबंधारे विभाग व बांधकाम विभागाने आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी. पालखी मार्ग व पालखीतळांवर शौचालय, हिरकणी कक्ष, चेंजिंग रूम यांची संख्या वाढवावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिराच्या कुरोली येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामांबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करावा. आषाढी यात्रा कालावधीत एस. टी. महामंडळाकडून तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येतात. त्या ठिकाणी प्रवाशांसाठी मुबलक प्रमाणात शौचालय, स्नानगृहाची व्यवस्था करावी, तसेच बसस्थानक स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या वेळी दिल्या. तसेच पालखी सोहळाप्रमुखांनी पालखी मार्गावर व पालखी तळांवर सोहळ्यासह भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी काही सूचना मांडल्या होत्या. त्या सूचनांची दखल घेऊन तातडीने कामे पूर्ण करावीत, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या वेळी सांगितले.