पंढरपूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून भरदिवसा चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चार ते पाच जणांनी ९ लाख रुपये सर्वांच्या डोळ्यादेखत पळवून नेण्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे भरदिवसा चोरट्याने पैसे लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
येथील स्टेट बँकेत ‘सीएमएस’ ही कंपनी रोज पंढरपूर शहरातील बँकांशी आर्थिक देवाण-घेवाण करते. नेहमीप्रमाणे सीएमएस कंपनीचे कर्मचारी सौरभ सतीश हैंदरे (वय २६, रा. पंढरपूर) हे १८ लाख रुपये बॅगमध्ये घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरण्यासाठी आले होते. १८ लाख पैकी ९ लाख रुपये बँकेच्या एका ट्रेमध्ये भरले व उर्वरित नऊ लाख रुपये बॅगमध्ये होते.
ती बॅग अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केली. ही बाब लक्षात येताच सौरभ हैंदरे व स्टेट बँकेतील अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी पोलिसांना खबर दिली. पंढरपूर येथे आठवडा बाजार आणि दोन दिवस सुट्टी असल्याने बँकेत गर्दी होती. मात्र चोरट्याने याचा फायदा उचलत हात साफ केला. दरम्यान, बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. असे असले तरी बकेतून छोट्या मोठ्या चोऱ्या होत असताना चोरट्यांनी बँकेचे ९ लाख रुपयेच चोरल्याने एकच खळबळ उडाली आहे.