मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झालेला असतानाच बीडमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार घडला. यानंतर आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी जाळपोळ झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी पंकजा मुंडेंनी या प्रकरणी निर्दोष लोकांना अटक करण्याचं काहीच कारण नसल्याचं मत व्यक्त केलं. तसेच पोलीस यंत्रणेने सावधपणे भूमिका घेतली पाहिजे, असं सूचक वक्तव्य केलं. त्या बुधवारी (८ नोव्हेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “प्रचंड भयानक स्थिती आहे. हे बघून मी फार अस्वस्थ झाले. अशा गोष्टी होऊ नयेत असं मला वाटतं. मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. अजूनही माझ्या मनात पालकाची भूमिका आहे. त्यामुळे मी सर्वांची भेट घेतली.”

“पोलीस यंत्रणांनी सावधपणे भूमिका घेतली पाहिजे”

“मी पीडितांशी चर्चा केली. ते प्रचंड अस्वस्थ आणि घाबरलेल्या स्थितीत होते. ते सर्व आता सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. एखादी अप्रिय घटना घडली आणि ती रोखता आली नाही, तर स्वाभाविकपणे वाटतं की, येथून पुढे गुप्तचर विभाग आणि पोलीस यंत्रणांनी सावधपणे भूमिका घेतली पाहिजे,” असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “१०१ जणांना अटक, ३०० लोक ताब्यात घेऊन चौकशी आणि…”; पोलिसांनी दिली बीड हिंसाचारप्रकरणातील कारवाईची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जाळपोळ प्रकरणाची एसआयटी चौकशी करा”

“या प्रकरणाची विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून चौकशी करावी. जे निर्दोष आहेत त्यांना या प्रकरणात अटक करण्याचं काहीच कारण नाही. तो मराठा असो किंवा आणखी कुणी असो, निर्दोष असेल त्याच्या पाठिशी आम्ही उभे आहोत. चुकीच्या पद्धतीने कारवाई होऊ देणार नाही. तसेच जो दोषी आहे तो कुणीही का असेना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली.