सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या बुधेश रंगारी यांची चार जिल्ह्यांत करोडो रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या मालमत्तांची चौकशी सुरू केली आहे. लाचखोरीदरम्यान रंगारी यांनी केलेल्या संभाषणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही उल्लेख आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.
रंगारी यांच्या घरातून तसेच लॉकरमधून लाचलुचपत विभागाने आतापर्यंत एक कोटी ६८ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याशिवाय अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटेही जप्त केली आहे. याशिवाय या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रंगारी यांच्या राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये मालमत्ता असल्याचेही आढळून आले आहे. यात नवी मुंबईसह नाशिक, नागपूर आणि रत्नागिरी येथील चार सदनिका, दोन व्यापारी गाळे आणि तीन प्लॉट अशा मालमत्तांचा समावेश असल्याचे रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख सुनील कलगुटकर यांनी सांगितले.
या सर्व मालमत्तांची किंमत काही कोटींच्या घरात असल्याचा बोलले जात आहे. त्यामुळे रंगारी यांच्या या मालमत्तांची तपासणी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे. पनवेल विश्रामगृहातील दोन केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी रंगारी यांनी ठेकेदाराकडून तब्बल ७५ हजार रुपयांची लाच मागितली होती. यात २० टक्के हिस्सा हा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे रंगारी यांच्या सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागातील इतर वरिष्ठ अधिकारीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाब नोंदवण्याची कारवाई बुधवारी दिवसभर सुरू होती.   
कर्जत येथील उपविभागीय अभियंता गिरीशकुमार पारीख यांच्या पाठोपाठ लाचखोरीच्या प्रकरणात अटक होणारे रंगारी हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुसरे अधिकारी ठरले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला आहे. कर्जतच्या पारीख यांच्यावर लाचखोरीप्रकरणी तसेच बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून आता रंगारी यांच्या विरोधातही बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय अलिबाग उपविभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची सध्या लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel pwd officer budhesh rangari holds property in four districts
First published on: 06-11-2014 at 04:12 IST