“फडणवीस मोदी-शाह यांना भेटले, नंतर सिंग यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय येतोय”

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केली शंका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. (संग्रहित छायाचित्र)

राज्याच्या राजकारणासाठी शनिवारची सायंकाळ हादरवून टाकणारी ठरली. सचिन वाझे प्रकरण गाजत असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांनी सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोप फेटाळून लावत राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी शंका उपस्थित केली आहे. “हे भाजपाचं षडयंत्र आहे. आधी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी-शाहांना भेटले आणि मग परमबीर सिंगांनी हे पत्र लिहिलंय. त्यामुळेच संशय बळावला आहे,” असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

मुकेश अंबानी स्फोटकं आणि धमकी तपासप्रकरणी गृहरक्षक दलात बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. गृहमंत्र्यांनी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटींचे हप्ते वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते, असा आरोप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केलेला आहे. या ‘लेटरबॉम्ब’मध्ये करण्यात आलेले आरोप राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हसन फेटाळले आहेत.

टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हसन मुश्रीफ म्हणाले, ‘परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा केविलवाण प्रयत्न आहे. अन्वय नाईक आणि टीआरपी घोटाळा प्रकरणात भाजपा त्यांच्यावर नाराज होता. त्यानंतर आता सचिन वाझे प्रकरणातून सिंग यांना वाचवण्यासाठीच हे कारस्थान सुरु आहे. देवेंद्र फडणवीस आधी दिल्लीत जाऊन बसले होते. तेथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आज (२० मार्च) सिंग यांनी हे पत्र दिलं म्हणून माझा संशय बळावला आहे. परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न होतोय. हे भाजपाचं कटकारस्थान आहे. ही ‘सोची समझी चाल’ आहे. यात चौकशी झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये. भाजपा सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहे,” असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Parambir singh letter cm uddhav thackeray home minister anil deshmukh hasan mushrif criticize devendra fadnavis and bjp bmh

ताज्या बातम्या