आपले आयुष्य संगीतकलेसाठी समíपत करीत गुरुवर्य स. भ. देशपांडे यांच्या संगीतकलेचा वारसा पुढील पिढीस हस्तांतरित करण्यासाठी अनेक शिष्य घडविणारे स्वरमयी व्यक्तिमत्त्व सूरमणी डॉ. कमलाकर परळीकर हे परभणीचे व महाराष्ट्राचे भूषण ठरले. येत्या काही दिवसांत ते भारतभूषण ठरावेत, अशी शुभकामना मान्यवरांनी व्यक्त करीत या स्वरयोग्याचे अभीष्टचिंतन केले. डॉ. परळीकर यांची संगीत साधना गौरवास्पद असल्याच्या भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या.
संगीतातील संशोधन, रागनिर्मिती, लेखन आदींसह संगीत विद्यालय, संगीत मफिली, सांगीतिक उपक्रम अशा विविध माध्यमांतून परळीकर यांनी ५० वर्षांपासून संगीत प्रचार-प्रसाराचे कार्य अव्याहत चालू ठेवले. डॉ. परळीकर यांनी पंचाहत्तरीत पदार्पण केले. या निमित्त अमृतमहोत्सव समितीतर्फे दोनदिवसीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले. वेदशास्त्रसंपन्न भागवताचार्य बाळूगुरू आसोलेकर, दत्तसंप्रदायातील अध्वर्यू अजितदादा तुकदेव यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, महापौर संगीता वडकर, स्वागताध्यक्ष माजी आमदार सुरेश देशमुख, महोत्सवाचे अध्यक्ष माधव वसेकर, सचिव विश्राम परळीकर यांची उपस्थिती होती.
खासदार जाधव यांनी भाषणात परळीकर यांच्या संगीत साधनेचा उल्लेख करीत या स्वरयोग्यास लवकरच भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार पाटील यांनीही छोटेखानी भाषणात परळीकर शतायुषी व्हावेत, अशी शुभकामना व्यक्त केली. महापौर वडकर यांनी परळीकरांच्या संगीतसेवेचा उल्लेख करीत परभणीत संगीत संस्कृती वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
धर्मसत्ता म्हणजे नादसत्ता. संगीत व दत्तपरंपरा याचे अजोड नाते आहे, असे सांगत अजितदादा तुकदेव यांनी स्वराचा साठा निर्माण करणारी केंद्रे निर्माण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आसोलेकर महाराज यांनी आशीवर्चनात संगीत ही अशी जादू आहे की त्यामुळे भगवंतप्राप्ती करता येते, असे सांगितले. पूजेपेक्षा स्तोत्रपठण श्रेष्ठ, पूजा, स्तोत्रपठण यापेक्षा संगीतशास्त्र श्रेष्ठ, संगीतशास्त्र पाचवा वेद आहे, असे ते म्हणाले.
माधव वसेकर यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कमलाकर परळीकर, शंकुतला परळीकर यांचा त्यांच्या शिष्यांनी सत्कार केला. यानंतर डॉ. राजा काळे व पं. अजय पोहनकर यांच्या शास्त्रीय गायनाची मफल झाली. या दोन दिग्गजांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सुधीर बर्वे, गंगाधर देव यांनी त्यांना तेवढीच तोलाची साथसंगत केली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2015 रोजी प्रकाशित
‘डॉ. कमलाकर परळीकर यांची संगीत साधना गौरवास्पद’
डॉ. परळीकर यांनी पंचाहत्तरीत पदार्पण केले. या निमित्त अमृतमहोत्सव समितीतर्फे दोनदिवसीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले.
First published on: 07-02-2015 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parbhani music ceremony