परभणी : अतिवृष्टीमुळे निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर सेलू ते वालूर मार्गावर असलेल्या एका पुलावरून पाणी जात असल्याने दोघेजण दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली होती. काल बुधवारी (दि.२०) त्यातील एकाचा मृतदेह सापडल्यानंतर आज गुरुवारी (दि.२१) सकाळी नऊच्या सुमारास दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. वेगवेगळी तीन पथके या शोध मोहिमेत दोन दिवसांपासून कार्यरत होती.

याबाबत अधिक माहिती अशी की निम्न दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने रस्त्यावरील पुलावर पाणी आले होते. त्याचवेळी मारुती हरकळ (रा. वालूर), छबुराव जावळे (रा. गुळखंड) हे दोघेजण सेलूहून वालूरला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जात होते. पुलावर आलेल्या पाण्यातून त्यांनी दुचाकी चालवल्याने दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यानंतर घटनास्थळी त्यांना वाचवण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले. मात्र पुराचा वेग अधिक असल्याने दोघेही वाहत्या पुरात दिसेनासे झाले.

घटनेनंतर प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली. बुधवारी सकाळी आठ वाजता पाथरी नगरपालिकेच्या तीन, मानवत व पूर्णा नगरपालिकेची प्रत्येकी एक अशी तीन पथके या कामी कार्यान्वित करण्यात आली. हे सर्व कर्मचारी बोटीतून नदीच्या पात्रात शोध घेत होते. काल बुधवारी दिवसभर शोध घेतल्यानंतर मारुती हरकळ यांचा मृतदेह सकाळी पथकाला सापडला. सायंकाळी सहा वाजता पथकाने आपले काम थांबवले. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली. सकाळी नऊच्या सुमारास छबुराव जावळे यांचाही मृतदेह शोध पथकाला आढळून आला. दरम्यान सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवाविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे येलदरी व निम्न दुधना या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीसह प्रवास करणाऱ्या या दोघांना मात्र प्राणास मुकावे लागले.