परभणी : येथील महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर शहरी भागात निवडणुकांचा माहोल तयार होत असतानाच आज शुक्रवारी (दि.१२) जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भागातही राजकीय हालचाली आणि समीकरणे जुळवण्यास सुरुवात झाली आहे.
ग्रामविकास मंत्रालयाद्वारे शुक्रवारी (दि.१२) मुंबईत जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण निश्चिततेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी ३२ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची निश्चिती करण्यात आली. परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. जिल्हा परिषद गठीत झाल्यानंतरच्या दिवसापासून सुरु होणार्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच शासनाच्या वतीने प्रस्तावीत करण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेत ही रचना नागरीकांना पाहण्यास उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे पाहावयास उपलब्ध असणार आहेत.
या प्रसिध्द करण्यात येत असलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सुचना असल्यास नागरीकांनी पुढील सोमवारी (दि.१५) दुपारी तीन वाजेपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. या हरकती व सुचना महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालय, मुख्य कार्यालयातील निवडणुक विभागात दाखल करता येणार आहेत. या निमित्ताने महापालिकेच्या निवडणूक पूर्व राजकारणाला गती मिळाली आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांनी आपापल्या मोर्चे बांधणीला प्रारंभ केला असून प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
एकीकडे महापालिकेच्या स्तरावर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच आज जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही कोणत्या प्रवर्गासाठी असणार ते जाहीर झाल्याने बहुतेक राजकीय पक्षांना आता पुढील आखणीसाठी दिशा निश्चित झाली आहे. परभणी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर समीकरणे बदलणार आहेत. पूर्वी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचे सदस्य मोठ्या संख्येने होते तर भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ जिल्हा परिषदेत तुलनेने कमी होते.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अनेक नवे जुने कार्यकर्ते दाखल झाले. काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये आयात कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा काय परिणाम होतो हेही दिसून येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर सध्या जिल्ह्यात अजित पवार गटाचे पारडे जड आहे.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजय भांबळे असे तरुण नेते या पक्षाकडे असल्याने जिल्हा परिषदेला हा पक्षही आपला राजकीय प्रभाव दाखवेल अशी स्थिती आहे. राज्यात भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सोबत असले तरी जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील असे संकेत आहेत.
निवडणुकीनंतरच्या सत्ता समीकरणात युती होईल पण त्याआधी महायुतीतले तिन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जाहीर झाल्यानंतर आता ग्रामीण भागातही राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.