राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या नगर जिल्हय़ातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवार अद्याप ठरवला नसला, तरी एका इच्छुकाने मतदार असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांसाठी जेवणावळींचा घाट घातला आहे. शनिवारी जि.प.च्या स्थायी समितीची व जलसंधारण समितीची सभा होणार आहे. त्यानंतर या इच्छुकाने सदस्यांसाठी ‘स्नेहभोजन’ आयोजित केले आहे.
विधान परिषदेच्या नगरमधील जागेसाठी दोन महिन्यांत येत्या डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. जि.प. सदस्य, पंचायत समिती सभापती, महापालिका, छावणी मंडळ, नगरपालिका, नगरपंचायतीचे सदस्य त्यासाठी मतदार आहेत. ठराविक संख्येने असणाऱ्या मतदारांमुळे ही निवडणूक खर्चिक व घोडेबाजार तेजीत आणणारी ठरते. त्याची सुरुवात या जेवणावळींनी होत आहे.
सन २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण जगताप यांनी बंडखोरी केली व त्यांनी काँग्रेसचे जयंत ससाणे, शिवसेनेचे डॉ. राजेंद्र पिपाडा यांचा पराभव करत विजय मिळवला. यंदा राष्ट्रवादीकडून पुन्हा जगताप यांच्यासह माजी आमदार अशोक काळे, चंद्रशेखर घुले आदी नावांची चर्चा होत आहे. विरोधकांकडे तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडी असताना जागा काँग्रेसकडे होती. मात्र गेल्या वेळी राष्ट्रवादीने बंडखोरी केली. आता काँग्रेसमधील विखे-थोरात गटाच्या रस्सीखेचीत कोणाला उमेदवारी मिळते, याची उत्सुकता आहे. युतीमध्ये जागा शिवसेनेकडे असली तरी पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही, शिवाय भाजपही जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे.
तीन दिवसांपूर्वी जि.प.च्या शिक्षण व आरोग्य समितीची सभा एका परमीट रूम व बीअर बार असलेल्या हॉटेलमध्ये आयोजित केली होती. या हॉटेलमध्ये ही सभा आयोजित करण्यामागेही इच्छुकाचे विधान परिषदेच्याच उमेदवारीचा मानस होता. सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनीही तसाच होरा व्यक्त केला. या सभांना इच्छुकांच्या मुलाची उपस्थिती त्याच उद्देशाने होती, असेही आता सांगितले जात आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जि.प. सदस्य व पं.स. सभापती असे तब्बल ८९ मतदार आहेत. त्यामुळेच जेवणावळींची सुरुवात जि.प. वर्तुळातून केल्याची चर्चा होत आहे. शनिवारी स्थायी समिती व जलसंधारण समितीची सभा आहे. त्याची पर्वणी साधण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मागची चूक सुधारण्यात आल्याचे सांगितले जाते. शिक्षण व आरोग्य समितीची सभाच हॉटेलमध्ये झाली. आता शनिवारी सभा झाल्यानंतर सदस्यांना तेथे जेवणासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे सदस्यांकडूनच समजले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2015 रोजी प्रकाशित
जि.प. वर्तुळात जेवणावळींना सुरुवात
विधानपरिषदेच्या मोर्चेबांधणीला वेग
Written by अपर्णा देगावकर
Updated:
First published on: 02-10-2015 at 03:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party celebration in zp circle background of election