अहिल्यानगर : गोरक्षकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या पाथर्डी बंदला आज, गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी झालेल्या सभेत हा हल्ला निंदनीय असून पुन्हा असा प्रकार घडल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.तिसगाव येथे गोरक्षक भारत लिपारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पाथर्डी बंदचे आवाहन केले होते. यावेळी अजिंठा चौकात जनआक्रोश मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यात आमदार पडळकर बोलत होते. आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, आदिनाथ महाराज शास्त्री, संग्राम भंडारे, धनंजय बडे, दिगंबर भवर, डॉ. मृत्युंजय गर्जे, बजरंग घोडके, डॉ. रमेश हंडाळ, संजय मरकड आदी उपस्थित होते. आयोजकांनी हल्ल्याच्या निषेधार्थ पाथर्डी बंदचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
आमदार राजळे म्हणाल्या गोरक्षकावरील हल्ले आम्ही सहन करणार नाही. भविष्यात गोरक्षकाची तक्रार आल्यास अधिकाऱ्यांनी ती गांभीर्याने घ्यावी. गोरक्षकावर जर कोणी खोटा गुन्हा दाखल केला तर तो खपवून घेतला जाणार नाही. ठराविक समाजाचे लोक मावा, गुटखा विक्री करतात. कत्तलखाने चालवतात. इतरांना त्रास देतात. त्यांना शासन झाले पाहिजे. शेवगाव शहरात यापूर्वी काय घडले हे सर्वांना माहिती आहे.