रक्ताच्या नात्यांपलीकडील काही नाती असतात जी आयुष्यभर कायम सोबत असतात. यामध्ये घट्ट ऋणानुबंध असातात. असेच काहीसं नातं पवार कुटुंबीय आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसणाऱ्या आजीबाईंचं आहे. इंदुबाई झारगड असं या आजीबाईंचं नाव आहे. त्यांचं आणि पवार कुटुंबियांचं रक्ताचं नात नाही. मात्र, पवार कुटुंबीयांच्या पत्येक कार्यक्रमात त्यांना मानाचं स्थान असते. पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच त्या वावरताना दिसतात.

या आजीबाईंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सांभाळ केला आहे. अजित पवार अवघ्या दोन वर्षांचे असताना इंदुबाई झारगड यांची पवार कुटुंबात एंट्री झाली होती. त्यानंतर तब्बल ५० वर्षापेत्रा जास्त काळ त्यांनी पवार कुटुंबासोबत घालवली आहे. अजित पवार यांच्यापासून ते अलीकडील काळात पार्थ आणि जय पवार यांच्यापर्यंत अनेक व्यक्तींचा त्यांच्या बालपणात सांभाळ केला आहे. सुख-दुखा:त त्या पवार कुटुंबाच्या सोबत होत्या. त्यामुळंच पवार कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात इंदुबाई या कुटुंबातील सदस्य म्हणूनच वावरताना दिसतात.

इंदुबाई झारगड या आता आपल्या गावी म्हणजेच इंदापूर तालुक्यातल्या काझड येथे वास्तव्य करतात. मात्र, पवार कुटुंबातील कोणताही कार्यक्रम असला की इंदूबाईना विशेष निमंत्रण दिलं जातं. सोबतच पवार कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडून त्यांना खास पोशाखही दिला जातो. त्या म्हणतात की, “उतारवयातही पवार कुटुंबातील सदस्य आपला सांभाळ करत आहेत. आपल्याकडेच राहावं असा आग्रह धरतात. पण आता मुलांनी तिकडे नेल्यामुळं इथं राहता येत नाही”