भाजप आणि या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा जातीयवादाचा बुरखा या निवडणुकीत आघाडीच्या वतीने फाडला जाईल, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. कोल्हापूरच्या जनतेने आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करून आपले पुरोगामित्व सिद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.     
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक व हातकणंगले मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण आज येथे आले होते. गांधी मैदान येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, गुजरातच्या विकासाची टिमकी वाजवत मोदी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहात आहेत. गुजरातचा विकास हा फसव्या स्वरूपाचा आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या तुलनेत गुजरात पिछाडीवर आहे. या विषयावर जाहीरपणे चर्चा करण्यासाठी मी मोदी यांना आव्हान दिले आहे, पण ते आव्हान स्वीकारण्यासाठी पुढे येत नाहीत.    
देशाच्या वा राज्याच्या निवडणुकीच्या वातावरणात बदल होत असल्याने या निवडणुकीत क्रांतिकारी स्वरूपाचा निकाल लागेल. आघाडीला राज्यात गतवर्षीपेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करून चव्हाण म्हणाले, दोन्ही काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते हातात हात घालून एकदिलाने प्रचारात उतरल्याचे चित्र कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. या वेळची निवडणूक ऐतिहासिक स्वरूपाची असून आघाडीच्या नगरसेवकांना निवडून देणे काळाची गरज आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरातून जातीयवादी पक्षांना वैचारिक आव्हान देण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतील. याच वेळी वळवळणारे भगवे आव्हान पश्चिम महाराष्ट्रात थोपविले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.     
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जातिधर्मात तेढ निर्माण करणा-या नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्याचा अधिकार नसल्याची टीका केली. लोकांना महात्मा गांधींचा गुजरात हवा आहे. त्यांना जातीय दंगल घडविणारा मोदींचा गुजरात मुळीच नको आहे. जातीयवाद्यांसमोर लोटांगण घालणा-या मंडलिक व शेट्टींना जनता या निवडणुकीत धडा शिकवेल.    
या वेळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार जयवंतराव आवळे, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, आमदार के.पी. पाटील, आमदार सा. रे. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, महापौर सुनीता राऊत आदी उपस्थित होते.