पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर पुतीनप्रमाणे राज्य केलं आहे आणि देशाला गुलाम बनवलं आहे. दहा वर्षांमध्ये गुलाम जन्माला घातले असं म्हणत रोखठोक या सदरात लेख लिहिला. या लेखाबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना आपल्या खास शैलीत टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी लेखात काय म्हटलं आहे?

‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची राजवट ४ जून रोजी संपते आहे याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. या दोघांना सत्तेवरुन दूर करण्यासाठीच देशातल्या जनतेने मतदान केले आहे. मोदी आणि शाह यांनी देशाचा तुरुंग केला व लोकशाहीलाच बंदिवान केले. त्यामुळे मोदी शाह यांचा पराभव होऊ शकत नाही असा भ्रम निर्माण झाला. मोदी हे देवाचे अवतार आहेत असे चित्र निर्माण करण्यात आले. त्यामुळे घरात अन्न, वीज, पाणी, रोजगार, निवारा नाही तरीही मोदी हवेत. माती खाऊन जगू असं म्हणणारे अंधभक्त या काळात दिसले. पण ज्यांनी आत्तापर्यंत मोदींना मतदान केलं तो शेतकरी, कष्टकरी वर्गच मोदींच्या विरोधात उभा ठाकला.’

हे पण वाचा- “…म्हणून देवेंद्र फडणवीस नाईलाजाने प्रचारात उतरले”, गडकरींचा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा; मोदी-शाहांना केलं लक्ष्य!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावर रशियाच्या पुतिनप्रमाणे राज्य केलं

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावर रशियाच्या पुतिनप्रमाणे राज्य केलं आणि देशाला गुलाम केलं. तसंच देशात गुलाम जन्माला घातले. गुलामही बंड करतोच. निवडणुका जवळजवळ संपल्या आहेत. ४ जून नंतर काय? यावर चर्चा सुरु आहेत. मोदी आणि शाह यांचा पराभव झाला तरी ते सहज सत्ता सोडणार नाहीत. एखाद्या हुकूमशाहप्रमाणे ते सत्ता सोडण्यास नकार देतील असं बोललं जातं आहे, ते खरे नाही. ४ जून नंतर देशाच्या राज्यघटनेला उभारी मिळणार आहे. लष्करप्रमुख, पोलीस प्रशासन यांचे प्रमुख मोदी आणि शाह यांचं काही एक ऐकणार नाहीत.’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे की संजय राऊतांबाबत मला विचारत जाऊ नका. जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात त्यांच्यावर मी बोलत नाही. मी ऐकलं आहे की लंडनमध्ये आहेत, तिथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. योग्य ते औषध त्यांनी घ्यावं” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनीच लगावला आहे.

मोदीच पंतप्रधान होतील

“निवडणूक निकालानंतर पंतप्रधान पदी नरेंद्र मोदीच विराजमान होतील. आम्ही बहुमत पार केलं आहे. आम्हाला अभूतपूर्व यश मिळणार आहे. मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. शपथविधी कधी होईल हे मी सांगू शकत नाही पण निश्चितपणे मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.