नगर शहरापासून दहा किमी अंतरावरील शिंदेवाडी गाव केवळ ३०० लोकसंख्येचे! सर्वच नागरिक शेतकरी कुटुंबातील. मात्र सध्या त्यांच्या मागे जिल्हाभरातील पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे ते त्रस्तही झाले आहेत. काही तर रात्री- अपरात्री घरी येणा-या पोलिसांमुळे भयभीतही झाले आहेत. या छोटय़ाशा वाडीतून जिल्हय़ातील अनेक राजकीय नेत्यांना, मान्यवरांना, वाळू ठेकेदारांना खुनाच्या, गोळय़ा घालण्याच्या, कटकारस्थान रचले जात असल्याची पत्रे गेली आहेत. काही पत्रे पोलीस ठाण्यांनाही गेली आहेत. अर्थातच ही पत्रे खोडसाळपणातून पाठवण्यात आली आहेत. मात्र गावातील कोणाचा तरी हा खोडसाळपणा आता गावाच्याच अंगलट आला आहे. त्यातूनच पोलीस चौकशीचे लचांड ग्रामस्थांच्या मागे लागले गेले आहे.
दौंड रस्त्यावर अरणगावलगत शिंदेवाडी आहे. गेल्या चार दिवसांत श्रीगोंदे, राहुरी, नगर तालुका येथील पोलीस शिंदेवाडीत चौकशी करून गेले आहेत. तेथील काही जणांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे जाबजबाबही नोंदवले आहेत. त्याने ग्रामस्थ गडबडून गेले आहेत. पोलिसांच्या चौकशीतून काहीच निष्पन्न झालेले नाही. ग्रामस्थांच्या नावाने ही बनावट पत्रे पाठवणा-या व्यक्तींचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अन्यथा आम्हाला उपोषणास बसावे लागेल, असा इशारा त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व निवासी उपजिल्हाधिका-यांना आज भेटून निवेदनाद्वारे दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, नगर तालुका बाजार समितीचे संचालक रेवणनाथ चोभे, वाळू ठेकेदार पाटीलबा रामभाऊ म्हसे (राहुरी), विजय गव्हाणे (राहुरी), विठ्ठल झावरे (टाकळी ढोकेश्वर, पारनेर), कुलदीप पाटील (वांबोरी) या इतर अनेकांना गेल्या काही दिवसांत त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करून त्यांचा खून करण्यात येणार असल्याचे, गोळय़ा घालण्यात येणार असल्याचे निनावी पत्रे टपालाद्वारे मिळाले. या पत्रात खाली शिंदेवाडीतील नावे देण्यात आली आहेत. पत्र संगणकावर टाइप केलेले आहे. केवळ एवढेच नाही तर नगर तालुका पोलिसांना एका निनावी पत्राद्वारे गावातील महिलांसह ६१ जणांची नावे कळवण्यात आली आहेत, हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे, गावठी कट्टे बाळगणारे आहेत. त्यांची चौकशी करावी असे त्यात म्हटले आहे. लगतच्या खंडाळा गावातील दौलत तुकाराम कार्ले हाही गावठी कट्टे बाळगणारा असल्याने त्याचीही चौकशी करावी, असेही एक पत्र आहे.
या बनावट पत्रांनी व पोलिसांच्या ससेमि-याने हैराण झालेले ग्रामस्थ गंगाधर शिंदे, गोरक्ष शिंदे, बाबासाहेब यशवंत शिंदे, झगन दामू शिंदे, विक्रम अप्पासाहेब शिंदे, साळकाराम बाजीराव शिंदे, भीमा हरिभाऊ शिंदे, नवनाथ साळकाराम शिंदे आदींनी पंचायत समिती सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, नगर तालुका पोलीस यांची भेट घेऊन बनावट पत्रे पाठवणा-यांचा शोध घेण्याची मागणी केली.
आजपर्यंत आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. गावात कोणताही गुन्हा घडलेला नाही. गावात कोणीही गुन्हेगारी वर्तन करणारे नाही. या पत्रांशी ग्रामस्थांचा काही संबंध नाही. सर्व जण शेतकरी कुटुंबातील आहेत. केवळ ग्रामस्थांना त्रास होण्याच्या उद्देशाने हे पत्र पाठवले गेले आहे. खोडसाळपणे पत्र पाठवणा-याचा त्वरित शोध घ्यावा, अशी बाजू संबंधितांकडे व ‘लोकसत्ता’कडे ग्रामस्थांनी मांडली.