Sanjay Raut criticize Central Government : कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. यावरून देशभरातील विरोधी पक्षांनी भाजपावर तोंडसूख घेतलं आहे. तसंच, कर्नाटकच्या निवडणुकीनंतर आता देशभरातील इतर प्रलंबित निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु, या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं.
“तुंबवून ठेवलेल्या निवडणुका घ्याव्यात. कधीही घ्या, पण तुमची हिंमत नाही. यांना देशात कोणत्याही निवडणुका घ्यायच्या नाहीत. कर्नाटकच्या निकालानंतर यांना जो हादरा बसला आहे, यामुळे खऱ्या अर्थाने देशात हुकुमशाही सुरू होईल का अशी आम्हाला भीती वाटते. यामुळे या ना त्या कारणामुळे महापालिका निवडणुकांपासून विधानसभा, लोकसभा पुढे ढकलत राहायचं अशाप्रकारे दिल्लीतील सरकार निर्णय घेऊ शकतं. याला हुकुमशाही म्हणतात, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
हेही वाचा >> शिंदे सरकारविरोधातील वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी पहिल्यांदाच बोलले संजय राऊत, म्हणाले…
“कर्नाटकमध्ये विधानसभेत भाजपाचा पराभव झाला असला तरीही ईव्हीएमविषयी आमच्या भूमिका कायम आहेत. बॅलेट पेपर, मतपत्रिका हाच लोकशाही सिद्ध करण्याचा मार्ग आहे. आता तुम्ही म्हणाल की कर्नाटकात जिंकलात. आम्ही महाराष्ट्रातही जिंकू. पण ईव्हीएमसंदर्भात आमची मागणी कायम आहे. आम्हाला बॅलेटपेपरवरच देशभरात निवडणुका हव्या आहेत”, असंही संजय राऊत म्हणाले.
दबावनितीला बळी पडणार नाही
संजय राऊतांवर काल (१४ मे) नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, “सामन्य माणसाच्या मनताल्या, कायद्याच्या चौकटीतील भावना मी व्यक्त केल्या. सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यामुळे स्पष्ट झालं आहे की या सरकावर अजूनहीअपात्रतेची टांगती तलवार आहे. या सरकारचा, पक्षाचा व्हिप बेकायदेशीर आहे, या पक्षाने नेमलेला गटनेता बेकायदेशीर आहे. राज्यपालांनी केलेली संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय व्हायचा आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे. या बेकायदेशीर सरकारचे आदेश पाळू नयेत कारण ते बेकायदेशीर ठरतील. आणि भविष्यात अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल, असं मी म्हणालो होतो. पण वक्तव्य संजय राऊतांनी केलंय त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्याकरता नाशिकच्या पोलिसांना आदेश देण्यात आले. परंतु, मी या कायदेशीर कारवाईला सामोरा जाईन, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> “विजय मिळाला असता तर श्रेय मोदींनी घेतले असते, पण पराभवाचे मडके…’ कर्नाटक निकालावरून ठाकरे गटाची भाजपावर टीका
माझ्यावर दबाव आणणं, शरण यायला भाग पाडणं, मग शिवसेना सोडायला लावणं, ठाकरेंना सोडायला लावणं ही दबावनिती आहे. या दाबावाला मी बळी पडणार नाही, असं ठाम मतही त्यांनी यावेळी सांगितलं.