बाजारपेठा बंदीचा परिणाम, युवा शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीचा कालावधी वाढल्याने वसईतील तरुणांनी आधुनिक प्रयोग करून केलेली ऑर्किड व आयरीसची फुलशेती अडचणीत सापडली आहे. बाजारपेठा, हॉटेल बंद असल्याने तयार झालेला फुलांचा माल पडून आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

तालुक्यातील अनेक युवकांनी शेतीला व्यवसाय म्हणून निवडले आहे. त्याच शेतात आधुनिक तंत्रज्ञान व पद्धतीचा वापर करून व्यापारी व नगदी पिके अशा विविध प्रकारचे प्रयोग करून फुलशेती केली असून त्यामध्ये केवळ देशी फुलांची लागवड न करता परदेशी फुलांचीही लागवड केली आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. मात्र सध्याच्या करोनाच्या संकटामुळे  बाजारपेठा, हॉटेल  बंद असल्याने तयार झालेला फुलांचा माल जागच्या जागी पडून आहे.

अर्नाळा येथे राहणाऱ्या भूषण पाटील या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात परदेशी पांढऱ्या व ऑर्किड फुलांची लागवड केली आहे. यासाठी लागणारे लोखंडी अँगल, प्लास्टिक रोप व नेटचा वापर करून जमिनीपासून दीड ते  दोन फूट वर असलेले ३३ बेड तयार केले आहेत. त्यावर नारळाच्या साली पसरवून एकूण १५ हजार फुलांची रोपे लावली आहेत. यासाठी २५ लाख रुपये खर्ची घातले आहेत. दीड वर्षांनंतर ही फुलबाग वसईच्या वातावरणात चांगल्या प्रकारे बहरू लागली होती.  पांढऱ्या व जांभळ्या रंगांची ही फुले आकर्षक व जास्त काळ टिकणारी असल्याने सजावटीसाठी या फुलांची मोठी मागणी होती. दरम्यान, टाळेबंदीमुळे सर्व काही बंद असल्याने या फुलांचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. व्यवसायच ठप्प झाल्याने यासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे हे सुद्धा कळेनासे झाल्याचे पाटील सांगतात.

दुसरीकडे महेंद्र पाटील यांनी सांगितले की, पंचतारांकित हॉटेलमध्ये फुलदाणीमध्ये ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खास आकर्षक आयरीस या फुलांची बाग फुलविली आहे. मागील दोन महिन्यांपासून सर्व हॉटेलेच बंद असल्याने या फुलांची खरेदी झाली नसल्याने सर्व फुले खराब झाली. त्यांना सर्व रोपे काढून फेकून द्यावी लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.  करोनाने फुलशेतीचे मोठे नुकसान केले आहे. त्यासाठी आयरीस लावला होता, परंतु त्यावरही आता पाणी फेरले आहे.

बाजारपेठा बंदचा फटका

करोनाच्या संकटामुळे बाजारपेठा बंद असल्याने सर्व फुलांचा माल पडून असल्याने त्यातून मिळणारे उत्पन्नही वाया गेले आहे. त्यातच ही फुले फुलविण्यासाठी केलेला खर्च ही निघाला नसल्याने मोठय़ा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधुनिक शेतीचा वेगळा प्रयोग म्हणून ऑर्किड फुलांची बाग फुलविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. दीड वर्षांपर्यंत त्याची वाटही पाहिली, परंतु ऐन विक्रीच्या हंगामात करोनाने वाट लावली. सरकारने आम्हाला मदत करावी.

– भूषण पाटील, फूल शेतकरी