scorecardresearch

MIMची महाविकास आघाडीला युतीसाठी खुली ऑफर; इम्तियाज जलील म्हणाले, “ओवैसी साहेबांसोबत…”

राज्यात एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत.

imtiaz jaleel and maha vikas aghadi
इम्तियाज जलील, महाविकास आघाडी (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्यात एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे. या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. असे असतानाचा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची खुली ऑफर दिली आहे. महाविकास आघाडीने एमआयएचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत चर्चा करावी, असे आवाहन जलील यांनी केले आहे.

हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेवर संजय शिरसाट यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “शरद पवारांच्या पावसातील एका सभेने…”

सध्या लोक खूप हुशार झाले आहेत

“मी याआधीही महाविकास आघाडीला ऑफर दिली होती. मुस्लीम समाज म्हणजे आमचीच मालमत्ता आहे, असे अगोदर राजकीय पक्षांना वाटायचे. मुस्लीम समाजाचे मत आमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असा त्यांचा समज होता. अशा परिस्थितीत एमआयएम पक्ष आला आहे. सध्या लोक खूप हुशार झाले आहेत,” असे इम्तियाज जलील म्हणाले.

हेही वाचा >>> पहाटेच्या शपथविधीचं रहस्य काय? प्रश्न विचारताच शरद पवारांनी एका ओळीत संपवला विषय म्हणाले…

हाविकास आघाडीच्या घटकपक्षांना खुली ऑफर

“आमच्यामुळे भाजपाला फायदा होतो, असे वाटत असेल तर चला आपण सोबत येऊ. मी याअगोदरही अशी ऑफर दिली आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत बसा. चर्चा करा. तुमच्यामुळे भाजपाला फायदा होत आहे. आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असे त्यांनी आम्हाला सांगावे; असे म्हणत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना खुली ऑफर दिली आहे.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार का?

दरम्यान, वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे सध्यातरी आमची युती फक्त ठाकरे गटाशी आहे, आम्हाला महाविकास आघाडीबद्दल काहीही माहिती नाही, अशी भूमिका वंचितने घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 15:28 IST
ताज्या बातम्या