हिटलरने जे जर्मनीत घडवलं तेच सध्या भारतात घडवण्याचा प्रयत्न होतो आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. CAA, NRC हा संविधानावरचा हल्ला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच आपल्याला एकत्र आणलं आहे. त्यामुळे आता आंबेडकर स्वीकारायचे की गोळवलकर हे आता देशानं ठरवायचं आहे असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. NRC विरोधात पुण्यातील सारस बागेच्या शेजारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये आव्हाड यांनी मोदी सरकारवर हा गंभीर आरोप केला आहे.

“CAA चा विरोध करण्यासाठी महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गानेच आपण पुढे गेलं पाहिजे असंही आव्हाड यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. इस्लाम खतरेमें है याऐवजी जेव्हा संविधान खतरेमें है असे नारे ऐकू येतात तेव्हा हा देश पुन्हा एकजूट होत असल्याची जाणीव होते” असंही आव्हाड म्हणाले.

यावेळेस आव्हाड यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावरही भाष्य केलं. पोलीस सरकारच्या आदेशानेच चालतात त्याचमुळे भीमा कोरेगाव हिंसाचार घडला असा आरोपही आव्हाड यांनी केला. एवढंच नाही इंदिरा गांधी यांच्याबाबत जे वक्तव्य केलं त्यावरही आव्हाड यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं. ” इंदिरा गांधी यांच्याबाबत जे काही वक्तव्य केलं त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी रक्ताने सेक्युलर आहे. इंदिरा गांधी या महान नेत्या होत्या. त्यांच्याबाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला” असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीने स्थापन केलेलं सरकारन अनेकांच्या डोळ्यात खुपतं आहे. मात्र कोणी कितीही काड्या केल्या तरीही आमच्यात आग लागणार नाही हे लक्षात ठेवा अशा शब्दात आव्हाड यांनी भाजपालाही सुनावलं.

आसाममध्ये हिंदूंना अटक केली आहे. त्या सगळ्यांची सुटका करण्यात यावी अशीही मागणी आव्हाड यांनी केली. पुण्यातील सारसबागेच्या बाजूला NRC, CAA आणि NPR विरोधात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत जितेंद्र आव्हाड, जिग्नेश मेवाणी, माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांची उपस्थिती होती.