कराड : सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान सप्ताह’ अंतर्गत कराड तालुका पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने विविध शाळांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाला. अभियानाचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी केले.
पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, अभिजित चौधरी, फौजदार सचिन भिलारी, साक्षात्कार पाटील, विठ्ठल खाडे, पोलीस हवालदार हसीना मुजावर, गणेश वेदपाठक, संजय जाधव, प्रदीप धस, योगेश गायकवाड यांच्या सहकार्याने उपक्रमांचे आयोजन केले.
या अंतर्गत आदर्श विद्यालय विंग, तारांगण इंग्लिश मीडियम स्कूल विंग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विंग, श्री संत घाडगेनाथ हायस्कूल कोळे व सद्गुरू प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा शेणोली येथे- पोस्टर प्रदर्शन, नशामुक्ती विषयक मार्गदर्शनपर व्याख्याने व रॅली काढण्यात आली.
रॅलीत ७५० विद्यार्थी सहभागी होते. ‘नशामुक्त भारत’ या घोषणांनी गावोगावी वातावरण दुमदुमून गेले. या रॅलीद्वारे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मादक पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव पोहोचविण्यात आली. याशिवाय २ हजार १०० विद्यार्थ्यांना आरोग्य, सामाजिक, आर्थिक व मानसिक समस्या, तसेच नशेपासून होणारे दुष्परिणाम माहिती देण्यात आली.
महेंद्र जगताप म्हणाले, मादक पदार्थांचा वापर ही गंभीर सामाजिक समस्या असून, ती केवळ व्यक्तीच नव्हे तर कुटुंब आणि समाजाला हादरवणारी आहे. नशामुक्त भारत अभियान ही केवळ सरकारी मोहीम नसून, सामूहिक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी यात सहभाग घेतला, तर स्वस्थ, सुरक्षित व समृद्ध भारताची उभारणी शक्य आहे.
कार्यक्रमादरम्यान, ‘नशामुक्त भारत माझे स्वप्न’ आणि ‘नशामुक्त भारत माझी जबाबदारी’ विषयांवर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजिल्या होत्या. स्पर्धेत ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर विद्यार्थ्यांनी आकर्षक फलक, प्रभावी चित्रे व विचारपूर्ण निबंध सादर केले. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उत्साह, घोषणाबाजीची ताकद आणि जनजागृतीचा संदेश यामुळे नशामुक्त भारत अभियानाची गोड सुरुवात झाल्याचे सुखद चित्र होते.