नांदेड : नांदेडच्या माजी नगरसेविकेने सोमवारी दमदाटी, जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याचीही धमकी दिल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.गुन्हा दाखल झालेल्या आरोपी आणि फिर्यादी यांच्यात भ्रमणध्वनीवरून झालेल्या संभाषणाची ध्वनीफित सर्वत्र प्रसृत झाल्यामुळे पोलिसांनी या घटनेची गंभीर नोंद घेऊन सदर ध्वनीफितीवरून कोणीही अफवा पसरवू नये व संयम राखावा, असे एका स्वतंत्र प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले. सदर महिलेविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचेही पोलीस विभागाने स्पष्ट केले.

वरील प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, आरोपीच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून त्याच्या दुरुस्तीसाठी त्यांनी फिर्यादी नोंदणीकृत व्यावसायिक-कंत्राटदार यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, या संभाषणादरम्यान आरोपीनी फिर्यादीस अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केल्याचे तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रसृत झालेल्या ध्वनीफितीवरून निदर्शनास आले.

फिर्यादी यांनी वरील प्रकारानंतर विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी भा.न्या.सं.च्या कलम २९६, ३५३ (२), ३५१ (४) अनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री उशिरा पार पाडली. आरोपी यांचे दिवंगत पती पाटबंधारे खात्यात कार्यकारी अभियंता पदावर होते. त्यांची एक कन्या तहसीलदार आहे. आपल्या पतीच्या हुद्याचा उल्लेख करून त्यांनी फिर्यादीस दमदाटी केल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या जातीचा उल्लेख करून अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. वरील गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतली. तसेच आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील कारवाईदेखील करण्यात येईल, असे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी बुधवारी दुपारी सांगितले.

अशोक चव्हाणांच्या नावाचा उल्लेख

खा.अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षात असताना आरोपी व त्यांचा परिवार चव्हाण समर्थक म्हणून ओळखला जात होता. काँग्रेसच्याच त्या माजी नगरसेविका होत्या. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातही त्यांनी काम केले. मागील काही वर्षांपासून त्या राजकारणातून अलिप्त आहेत. वरील फिर्यादीशी बोलताना त्यांनी खा. चव्हाण यांचाही अनावश्यक उल्लेख केल्याचे समोर आले.