केबीसी कंपनीच्या कोटय़वधीच्या घोटाळ्याने माय-लेकांचा बळी घेतल्यानंतर या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंधित असणाऱ्यांचे अटकसत्र पोलीस यंत्रणेने सुरू केले आहे. त्या अंतर्गत अटक झालेल्या कंपनीच्या संचालकासह व्यवस्थापक व कर्मचारी अशा तीन संशयितांची मंगळवारी न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. या शिवाय, मुख्य संशयितांच्या तीन नातेवाईकांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणाची व्याप्ती दिवसागणीक वाढत असून राज्यातील गुंतवणुकदारांची कोटय़वधींची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तीन वर्षांत तिप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून कंपनीने हजारो नागरिकांना गंडविल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कंपनीत गुंतविलेली रक्कम परत मिळण्याची आशा संपुष्टात आल्याने निराश झालेल्या माय-लेकांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्यामुळे गुंतवणुकदारांचा धीर खचत चालल्याचे अधोरेखीत झाले आहे. या कंपनीसाठी दलाल म्हणून काम करणारा सागर निकम याच्यासह त्याची आई पुष्पलता या दोघांनी आयुष्यभराची पुंजी बुडाल्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. उभयतांनी लिहिलेल्या चिठ्ठीत केबीसीचे संचालक भाऊसाहेबच्या नावाचा उल्लेख असल्याने त्याच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी एका गुंतवणूकदाराने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केबीसी क्लब अॅण्ड रिसॉर्ट प्रा. लि. नावाची कंपनी स्थापन करणारे भाऊसाहेब छबु चव्हाण व त्याची पत्नी आरती, बापूसाहेब चव्हाण या संचालकांसह दलाल व कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक तक्रारदार पुढे येऊ लागल्यानंतर फसवणुकीचा आकडा कोटय़वधींचा घरात गेला आहे. काही महिन्यांपूर्वी पोलीस यंत्रणेने या कंपनीच्या संचालकांना अटक करून नागरिकांना तक्रार देण्याकरिता पुढे येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यावेळी गुंतवणूकदार पुढे आले नाहीत. ही बाब संचालकांच्या पथ्यावर पडली आणि मुख्य संशयित भाऊसाहेब व आरती चव्हाण हे देश सोडून पसार झाल्याचे सांगितले जाते.
दुसरीकडे फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी संचालक बापूसाहेब चव्हाण, व्यवस्थापक पंकज शिंदे व कर्मचारी नितीन शिंदे यांना अटक केली. त्यांना मंगळवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या संशयितांची २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणी मुख्य संशयिताचा शालक पोलीस कर्मचारी संजय वामन जगताप, संशयिताचा भाऊ नानासाहेब चव्हाण व साधना चव्हाण यांनाही अटक करण्यात आली आहे. बापू चव्हाण हा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीस होता. या बँकेच्या जिल्हाभरातील शाखेतील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याने गरीब शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट केल्याचे तपासात पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे.