अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात स्फोट घडवून सहकाऱ्याचा खून करणाऱ्या प्रल्हाद पाटील याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ तील पोटकलम (२)(बी)च्या तरतुदीनुसार पोलीस अधिक्षक मो. सुवेझ हक यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याशी असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विवाहबाह्य़ संबंधातून २८ ऑक्टोबरला ११.३०च्या सुमारास प्रल्हाद पाटील याने पोलीस मुख्यालयात स्फोट घडवून आणला होता. यात श्रीवर्धन येथे नेमणुकीवर असणाऱ्या निलेश पाटील याचा मृत्यू झाला होता. तर अन्य एक कर्मचारी जखमी झाला होता. या प्रकरणी प्रल्हाद पाटील याच्या विरोधात अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम ३०२, ३०७, ३२४ आणि स्फोटक अधिनियम १९०८ च्या कलम (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर प्रल्हाद पाटील याला अटक करण्यात आली होती. प्रल्हाद पाटील याची ही कृती गुन्हेगारी स्वरुपाची आणि विकृत मानसिकतेची होती. अशा व्यक्तीला पोलीस दलात ठेवल्यास ती समान्य जनता, समाज आणि राष्ट्रासाठी घातक ठरू शकेल. ही बाब लक्षात घेऊन त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात येत असल्याचे परिपत्रक पोलीस अधिक्षक कार्यालयाने जारी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police constable suspend
First published on: 21-11-2015 at 04:38 IST