जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. आंदोलकांनी जो मंडप उभारला होता त्यात पोलीस घुसले आणि पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. आंदोलकांनी दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

जालना जिल्ह्यातल्या अंतर्वली गावात ही घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. २९ ऑगस्टपासून हे उपोषण आंदोलन सुरु होतं. मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही. त्यानंतर आज पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. लहान मुलं, महिला कुणालाही पाहिलं नाही. प्रचंड लाठीचार्ज केल्यानंतर आम्ही शांत का बसायचं असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे. एवढंच नाही पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

मराठा आंदोलकांनी काय म्हटलं आहे?

धुळे सोलापूर रस्त्यावर आंदोलकांनी आता बस आणि वाहनांची जाळपोळ सुरु केली आहे. आंदोलकांनी असं म्हटलं आहे की पोलिसांनी आमच्या आंदोलकांना मारण्यास सुरुवात केली. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो तरीही लाठीचार्ज करण्यात आला असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं आहे?

आम्ही शांततेत आंदोलन सुरु केलं होतं. आम्ही शांतपणेच उपोषण आंदोलन करत होतो. काल आमचं शिंदेसाहेबांचं (मुख्यमंत्री) आणि आमचंही बोलणं झालं. आज अचानक खाडे म्हणून कुणीतरी आले. मला म्हणाले की तुम्ही उपचार घ्या. त्यानंतर मी हो म्हटलं. मात्र पोलिसांनी बहुदा आंदोलन मोडायचं ठरवलं आहे. पण माझं मराठा आंदोलकांना आवाहन आहे की जाळपोळ करु नका, तोडफोड करु नका. जे काही झालं ते ब्रिटिशांच्या काळातही घडलं नव्हतं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सगळ्या बांधवांनी शांत रहावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.