रत्नागिरी शहर व जिल्ह्य़ात झालेल्या दोन्ही खुनांचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एकूण चारजणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही आरोपी फरारी असून त्यांचा तपास चालू आहे.
रत्नागिरी शहरालगत कारवांची वाडी रेल्वे पुलाखाली गेल्या रविवारी (३० ऑगस्ट) सकाळी अभिजीत पाटणकर या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.
त्याचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी त्याबाबत तपास सुरू केला. या प्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली असून त्यांना ५ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी (३१ ऑगस्ट) सकाळी सतीश सूर्यकांत आंब्रे या गतिमंद तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे-तेलीवाडी येथे राहणाऱ्या या युवकाचा कौटुंबिक कारणातून त्याचे वडील सूर्यकांत लक्ष्मण आंब्रे यांनीच खून केला असल्याचे तपासात आढळून आले आहे.
त्यांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता ५ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. लागापोठ घडलेल्या खुनांच्या या दोन घटनांमुळे पोलीस खात्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. पण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस.एल.पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध अंगांनी तपास करून दोन्ही गुन्ह्य़ांचा दोन दिवसातच छडा लावला. यापैकी अभिजीत पाटणकरच्या खुनाचा तपास जास्त गुंतागुंतीचा असल्याचे स्पष्ट करून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, या प्रकरणी आत्तापर्यंत तिघाजणांना अटक करण्यात आले आहे. हे तिन्ही संशयित आरोपी स्थानिक असून तस्करी किंवा बांधकाम व्यवसायाचा या घटनेशी संबंध नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून आरोपींनी अभिजीतचा घटनास्थळीच खून केला असल्याचे आतापर्यंतच्या तपासामध्ये दिसून आले आहे. त्याचबरोबर आणखी काही आरोपी फरारी असून त्यांचा शोध चालू आहे. त्यातून गुन्ह्य़ामागील हेतू आणि अन्य महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश पडेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तपासाच्या सध्याच्या टप्प्यावर आरोपींची नावे उघड करण्याबाबत डॉ. शिंदे यांनी असमर्थता व्यक्त केली.
सतीश आंब्रे या तरुणाचा खून त्याच्या वडिलांनीच केला असल्याच्या निष्कर्षांप्रत पोलीस आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच खून करण्यासाठी त्यांनी वापरलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली आहे. पण खुनामागील हेतू अजून स्पष्ट होऊ शकलेला नाही. त्याबाबत तपास चालू असल्याचे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police open both murder mystery of ratnagiri
First published on: 02-09-2015 at 01:29 IST