महाशिवरात्रीच्या विशेष पर्वानिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी नाशिककडे निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई कुठे आहेत, याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतो आहे. तृप्ती देसाई नाशिक जिल्ह्यात आल्या आहेत की नाही, याबद्दल अद्याप पोलीस अनभिज्ञच आहेत. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या महिला आंदोलकांना रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी जय्यत तयारी केली आहे. मंदिराच्या बाहेरच हिंदुत्ववादी संघटनांच्या महिलांनी गर्दी केली आहे. त्याचबरोबर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महाशिवरात्रीमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी आहे. भाविकांच्या दर्शनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल. कोणीही मंदिर परिसरात अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना ताब्यात घेण्यात येईल, असे नाशिकच्या पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
प्रत्येक देवस्थानच्या निरनिराळ्या प्रथा-परंपरा असतात. त्याप्रमाणे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू महिला व पुरूष यांना प्रवेश आहे. मात्र, गर्भगृहात केवळ सोवळे नसलेल्या अर्धवस्त्रधारी पुरूषांनाच प्रवेश आहे. ही शेकडो वर्षांची परंपरा असून या ठिकाणी देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे आदी महिलांनी दर्शन घेताना प्रथा परंपरांचे पालन केल्याचा दाखला समितीने दिला आहे. भूमाता ब्रिगेडला कोणतेही काम राहिलेले नाही. त्यांच्या आंदोलनाचा शनी शिंगणापूर येथे फज्जा उडाल्यानंतर त्यांची नजर त्र्यंबकेश्वर येथे असल्याचे समितीचे संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.