पुरवणी परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी शासकीय ज्युबिली हायस्कुलमध्ये तैनात असलेल्या एका पोलिस शिपायाने रविवारी रात्री ९ वाजता गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. रवींद्र गेडाम (४०) असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे.
जिल्हा पोलिस दलातील रवींद्र गेडाम यांची प्रकृती दोन महिन्यापासून खराब होती. काही दिवसांपूर्वी प्रकृती सुधारल्यानंतर २५ सप्टेंबरला मुख्यालयात कामावर रुजू झाले. सध्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा सुरू आहेत. कस्तुरबा मार्गावरील शासकीय ज्युबिली हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे पेपर आहेत.
या पेपरच्या सुरक्षिततेसाठी पोलिस शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिपाई रवींद्र गेडाम हा या व्यवस्थेत होता. रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास कामावरील सर्व पोलिस जेवणासाठी म्हणून बाहेर गेले तेव्हा रवींद्र एकटाच शाळेत होता. कुणीही नाही, हे बघून रवींद्रने बंदुकीने स्वत:वर गोळ्या झाडल्या. यावेळी त्याने दोन फायर केले. त्यातील एक गोळी त्याला स्वत:ला आणि दुसरी शाळेच्या छताला लागली.
यात रवींद्रचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जेवण करून परतलेल्या पोलिस शिपायांना रवींद्रचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राजीव जैन व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.