नाशिकमध्ये भाजपचा मेळावा उधळून लावणाऱ्या शिवसैनिकांच्या अटकेवरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या राजकीय शिमगा रंगल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे नेते या मुद्द्यावरून प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी भाजपवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षांतील तणाव वाढण्याची शक्यता आहे. भाजप म्हणजे भुंकणारं कुत्रं असून त्यांना सत्तेचा माज चढला आहे, अशी शेलकी टीका शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी केली. सध्या सत्तेत आल्यामुळे भाजप आमची कबर खोदण्याची भाषा करत आहे. राज्याचे गृहमंत्री व नाशिकचे पालकमंत्री यांच्या दबावामुळे शिवसैनिकांवर दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मात्र, फर्ग्युसन महाविद्यालयात आमदाराच्या गाडीवर दगडफेक करणारे केवळ भाजपचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही, असा आरोप यावेळी अजय चौधरी यांनी केला. भाजपनेही प्रत्युत्तर देताना गेली २० वर्षे हा भुंकणारा कुत्रा शिवसेनेला कसा चालला, असा सवाल केला आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनीदेखील आमच्या नादाला लागाल तर आडवे करू, अशा इशारा भाजपला दिला.
शिवसैनिकांविरुद्ध सूड भावनेतून कारवाई
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मराठवाडय़ाबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आणि शिवसैनिकांनी भाजप महिला आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमात धुडगूस घालत उधळण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात स्थानिक भाजप आमदारांच्या मागणीमुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह नऊ जणांना अटक केली होती.
‘मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच शिवसैनिकांवर दरोडय़ाचा गुन्हा’