अहिल्यानगर: नागपूर-पुणे वंदे भारत रेल्वेला नगर रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्याच्या मुद्द्यावरून नगरमध्ये राजकीय श्रेयवादाची लढाई केली जात आहे. प्रत्यक्षात या रेल्वेचा नगरकरांना किती उपयोग होणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागपूर-पुणे वंदे भारत रेल्वे आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. या रेल्वेच्या नगर रेल्वे स्थानकावरील स्वागताचा कार्यक्रम उद्या, रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर श्रेयवादाची चढाओढही सुरू झाली आहे.
शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी २३ जुलैच्या रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत आपण थांबा देण्याची मागणी केली होती, त्याची दखल घेत वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. तर अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी नगरला थांबा दिल्याने आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा केला आहे.
यासंदर्भात बोलताना माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी म्हटले की, वंदे भारतला नगरच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला याचे श्रेयवाद कोणी घेऊ नये. मलाही त्या वादात पडायचे नाही. जे श्रेय घेतात त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी तर हे केले नाही ना? शरद पवारांनी वंदे भारत चालू केली आहे का? पवारांनी नगरच्या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण केले आहे का? त्यामुळे श्रेय घ्यायचे त्यांनी घ्यावे, मात्र श्रेय घेताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानावेत व फलकावर मोदी यांचे फोटो लावावेत. मग श्रेय घेतले तरी आमची काही हरकत नसेल. याचे श्रेय सुजय विखेंना नाही केवळ एकाच व्यक्तीला श्रेय जाते ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
वेळापत्रकाचा अभ्यास न करता श्रेयवाद
वंदे भारत रेल्वेच्या वेळापत्रकाचा अभ्यास न करताच श्रेय घेण्याचा आनंद व्यक्त केला जात आहे, अशी टीका जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी केली आहे. नगर-पुणे रस्त्यावरील गंभीर वाहतूक समस्या कोणाला समजलेली नाही. रेल्वे मंत्रालयाकडूनही सावत्र आईसारखे नगरकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. वंदे भारतचे वेळापत्रक नगरकरांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे ही रेल्वे नगरकरांच्या किती उपयुक्त ठरेल हा प्रश्न आहे. त्याऐवजी पुण्याहून रोज संध्याकाळी नगरला येणारी इंटरसिटी रेल्वे सुरू होणे हाच एकमेव नगर-पुणे मार्गासाठी पर्याय असल्याचा दावाही मुळे यांनी केला आहे.