पंढरपूर : राजकारण आणि कुटुंब या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येणार या फक्त चर्चा आहेत. जे काही होईल ते आपण बघालच, असे म्हणत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणावर खासदार सुनेत्रा पवार यांनी हात जोडत अधिक बोलणे मोठ्या शिताफीने टाळले. तालुक्यातील वाखरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सुनेत्रा पवार आल्या होत्या. यावेळी त्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या.

खासदार सुनेत्रा पवार यांनी वैष्णवी हगवणे बाबत झालेल्या घटनांचे समर्थन करत नाही, अशा घटना व्हायला नको आहेत. पक्षाने याबाबत भूमिका मांडली आहे. तर महिला आयोगाकडून दिरंगाई होते, असे विचारले असता याबाबतसुद्धा पक्षाच्या पदाधिकाऱ्याने भूमिका मांडलेली आहे, असे म्हणत त्या गोष्टींवर अधिक बोलणे टाळले.

‘लाडक्या बहिणी’च्या वाढीव हप्त्याबद्दल अजित दादा निर्णय घेतील. ते जे बोलतात ते करतात आपल्याला माहीत आहे. असे म्हणत अजित पवारांच्या शब्दाला जागण्याच्या स्वभावाचे त्यांनी कौतुक केले. दरम्यान, महिला आघाडी मेळाव्यासाठी खासदार सुनेत्रा पवार यांना थोडा उशीर झाला. मात्र, जमा झालेल्या महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी पुन्हा हे पक्षाचे गाणे लावण्यात आले. या गाण्यावर काही महिलांनी अनोखा डान्स केल्याचे पहायला मिळाले. या महिलांनी केस मोकळे सोडून गाण्यावर ठेका धरत अंगात आल्यावर नाच केला जातो तसा ठेका धरला. मेळाव्यास उपस्थित महिला देखील आश्चर्यचकित होऊन पाहत होत्या. याचे चित्रीकरण समाजमाध्यावर लगेचच प्रसारित झाले. आयोजकांच्या ही बाब लक्षात येताच ताबडतोब हा प्रकार थांबवण्यात आला. मात्र, महिला मेळाव्यात खासदार सुनेत्रा पवार यांच्या भाषणापेक्षा महिलांनी केस मोकळे सोडून केलेल्या नाचाबाबतच चर्चा झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या मेळाव्यात महिलांसाठी पक्ष आणि सरकार विविध योजना राबवीत आहे. आगामी स्थानिक निवडणुकीत महिलांना संधी मिळणार आहे. महिलांनी समाज माध्यमाचा वापर हा पक्षाचे धोरण, योजनांची माहिती आदींसाठी करावा, असे मार्गदर्शन खासदार सुनेत्रा पवार यांनी केले. कार्यक्रम संपल्यावर खासदार सुनेत्रा पवार यांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले.