माझा हट्ट पुरवण्यासाठी जिल्हा खंबीर, दिलेला शब्द पूर्ण करु

माझा हट्ट पुरवण्यासाठी नगर जिल्हा खंबीर आहे. मला दुसऱ्या आजोबांची गरज नाही. राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारा मी तिसरा उमेदवार आहे. भाजप आणि विखे यांची ताकद काय असते हे जिल्ह्याने राज्याला दाखवून दिले आहे, आता यापुढे दडपशाहीचे व नातलगशाहीचे राजकारण चालणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे विजयी उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी मतमोजणीच्या ठिकाणी व्यक्त केली. आपला विजय आजोबांना श्र्द्धांजली म्हणून अर्पण करतो, असाही उल्लेख डॉ. सुजय विखे यांनी केला.

विजय स्पष्ट होऊ लागताच डॉ. विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझा विजय हा सर्वसामान्य जनता, शेतकरी व युवकांचा आहे. आपला संघर्ष काँग्रेसशी नव्हताच, कारण काँग्रेसने आम्हला खुप दिले, खरा संघर्ष होता तो राष्ट्रवादीशी. मला व माझ्या कुटुंबाला मोठय़ा संघर्षांत, संकटात टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यासाठी जिल्ह्य़ातील, जिल्ह्य़ाबाहेरील सारे एक झाले. माझ्या आजोबांविरुद्धही जिल्ह्य़ात सर्व एक होत असत. मलाही तोच अनुभव आला आहे.

संघर्षांच्या राजकारणात हा सर्वात मोठा विजय आहे. आमच्या कुटुंबाला अनेक संकटातून जावे लागले.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी उमेदवारी डावलली, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळेच मी भाजपमध्ये आलो. नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी मला दुसऱ्या आजोबांची अजिबात गरज नाही. जिल्ह्यातील जनतेनेच माझे हट्ट पुरवले आहेत. गोरगरीब जनता, सर्वसामान्य कर्मचारी यांना या विजयाचे श्रेय जाते. तसेच आमदार, पालकमंत्री, नगरसेवक यांनीही मला स्वीकारले. पक्षात नवीन असूनही भावाप्रमाणे प्रेम केले. सर्वजण एकत्रित राहिले. त्यामुळे हा विजय शक्य झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकला. तो विश्वास सार्थ ठरला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तरेची जबाबदारी दिली होती. तसा शब्दही आम्ही त्यांना दिला होता. ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे नेते आहेत. एक हाती सत्ता त्यांनी आणली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यामुळेच आता वडिल आणि आईलाही भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह करेल. इकडे एवढे चांगले आहे, तिकडे राहण्यात अर्थच नाही. विशेष म्हणजे नगर शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. हे माझ्यासाठी एक आश्चर्यच आहे. नगर शहरामध्ये नवीन उद्योग आणण्याचा, उड्डाणपुलाचा शब्द मी दिलेला आहे. तो मी पूर्ण करेल, असे विखे म्हणाले.

विखे अर्धी पैज जिंकले..

विजयी उमेदवार डॉ. सुजय विखे हे मुख्यमंत्र्यांबरोबर अर्धी पैज जिंकले आहेत तर अर्धी पैज हरले आहेत. डॉ. विखे यांनीच पत्रकारांना याची माहिती दिली. मात्र पैज कशाची होती, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. महाराष्ट्रातील प्रथम तीन क्रमांकामध्ये माझे मताधिक्य असेल, असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. तर मुख्यमंत्र्यांनी राज्यात ४२ जागा युतीला मिळतील, तर मी ३८ जागा मिळतील, असे सांगत होतो, त्यातील राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मला मिळाले आहे, अशी अर्धी पैज मी जिंकल्याचे विखे म्हणाले.

आ. जगताप आज प्रतिक्रिया देणार

राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर मी अद्याप विचार केला नाही, कोणाशी चर्चा केली नाही, त्यामुळे मी उद्या, शुक्रवारीच पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया व्यक्त करेल, असे स्पष्ट केले.