कराड : भाषेच्या मुद्द्यावर दुही पसरवण्याचे प्रयत्न लोकशाहीला धरून नाहीत. हा सर्व प्रकार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रचलेला राजकीय डाव असल्याची टीका राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता केली. भाषेवरून दुही पसरवण्याचा हा प्रयत्न समाजच उधळून लावेल असा विश्वासही लोढा यांनी व्यक्त केला.
कराडमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे या वेळी उपस्थित होते. मुंबईसह राज्यात सध्या मराठी व हिंदी भाषेवरून निर्माण होत असलेल्या वादांवरून वातावरण तापले असताना, हे सर्व राजकीय हेतूने सुरू असल्याचा आरोप करत लोढा यांनी मनसे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटावर निशाणा साधला.
मंत्री लोढा म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला नेहमीच मान दिला. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही मराठी भाषेसाठी ठोस प्रयत्न झाले. त्यामुळे आज या विषयावरून जनतेत दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना समाजच खडे उत्तर देईल,’ मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक मंत्र्यावर दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. त्या अंतर्गत आम्ही कार्यकर्त्यांशी नियमित संवाद साधत आहोत. याच अनुषंगाने कराड आलो असल्याचे लोढा यांनी सांगितले.